चंदाराजा,

मी सुरुवातीलाच हे नमूद करते की आपल्या मतांचा आदर आहे. हा प्रतिसाद तुमचे/तुमच्या मतांचे खंडन करण्यासाठी नाही. तर केवळ आपल्या प्रतिसादातील वाक्यांचा आधार घेऊन माझी मते विस्तारात लिहिली आहेत. कृपया गैरसमज नसावा.

आपण म्हणता की आपल्याकडली बदललेली मानसिकता या प्रकारच्या कार्यक्रमांना सोकावलेली आहे हे मात्र निश्चित.

मला वाटतं की मानसिकता आधी बदललेली नसते तर असे कार्यक्रम दाखवून ती बदलवली जाते. 

असा कार्यक्रम पाश्चात्य देशात लोकप्रिय झाला कारण तिकडच्या लोकांनी त्यातल्या एक्साइटमेंट(माफ करा, योग्य मराठी शब्द ऐनवेळी आठवत नाहीये.) सोबत त्यातल्या कटू सत्याचाही स्वीकार केला. याला कारण त्यांची व्यक्तिस्वातंत्र्यावर भर देणारी संस्कृती! परंतु, भारतात परिस्थिती वेगळी आहे. (येथे मला पाश्चात्य संस्कृती वाईट आणि आपली चांगली हा मुद्दा मांडायचा नाहीये. जेवढा मला आपल्या संस्कृतीबद्दल अभिमान आहे तेवढाच इतर संस्कृतींबद्दल आदर आहे.)

या अश्या कार्यक्रमांमध्ये आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे बेमालूम नाटकीपणा. 'मी असं असं बोलेन तुम्ही आरड ओरडा करा' मग ही गोष्ट वर्तमानपत्रवाल्यांकडे पद्धतशीरपणे पोचवायची की आपसूकच कार्यक्रमाची भरमसाठ जाहिरात होते. प्रश्नकर्ता आणि उत्तर देणारा दोघानाही प्रसिद्धिच प्रसिद्धी.

१००% सहमत.

यामुळे समाजव्यवस्थेला बाधा पोचेल म्हणजे नेमकं काय होईल? मुळातच ती बाधारहीत आहे असं तुम्हाला वाटतं कां?

मूळ चर्चा-प्रस्तावात दिलेल्या उदाहरणाचा भाग जर तुम्ही पाहिलात तर तुम्हाला मला काय म्हणायचंय ते लक्षात येईल. त्या महिलेला विचारलेले प्रश्न, तिने दिलेली उत्तरे आणि त्या पॉलिग्राफ यंत्राने दिलेला निवाडा बघता त्या स्त्रीचे तिच्या आईसोबतच्या नात्यात नक्कीच, थोडा का होईना, तणाव निर्माण होईल. तिच्या पतीसोबतच्या संबंधांवर तर काय परिणाम होईल काही नेम नाही. कदाचित माझी शब्दयोजना जरा चुकली. मी 'समाजव्यवस्था' ऐवजी 'कुटुंबव्यवस्था' हा शब्द निवडायला हवा होता. परंतु, कुठेतरी बाधा होतेच आहे ना?

हा कार्यक्रम 'मनोरंजन', जास्तीत जास्त 'खेळ' या विभागात मोडतो असे मला वाटते. तर एखादा खेळ खेळवून, खेळाडूचे आयुष्य(म्हणजे त्यातल्या अतिशय महत्त्वाच्या गोष्टी) पणाला लावून, तिसऱ्यांचेच मनोरंजन करणे आणि स्वतःचा गल्ला भरणे कितपत योग्य आहे?

यामध्ये भाग घेतलेल्या व्यक्तीनी खरं तर विचारपूर्वक भाग घेतला पाहिजे.

मान्य. पण हे चालू राहील तोवर 'High risk, high gain' हा विचार करून, परिणामांचा विचार न करता अनेक सामान्य नागरिक (खरं तर मूर्ख लोक) त्यात भाग घेतच राहतील.

'उन्मत्त' हा शब्द मी मुद्दाम करड्या शाईत लिहिला कारण ते माझं अगदी व्यक्तिगत मत आहे आणि काहींना पटणार नाही याची मला पूर्वकल्पना होती. बाकी या प्रश्नावर भूषणरावांनी उत्तर दिलंच आहे.

धन्यवाद!