हा कार्यक्रम मी बघितला नाही कारण आमच्याकडे केबल नाही. (नशीब) पण त्याबद्दल वाचले आहे. माझ्या मते हा कार्यक्रम ताबडतोब बंद व्हायला हवा. एकतर यात भाग घेणारे काही गुन्हेगार नाहीत. त्यांनी लाय डिटेक्टर समोर का बोलायचे? शिवाय या कार्यक्रमात भाग घेणाऱ्या महिला चांगल्या घरातल्या आहेत. मग त्यांना वाह्यात प्रश्न का विचारले जातात? ज्या महिलेला तिच्या खाजगी आयुष्याबद्दल अत्यंत वाईट प्रश्न विचारला गेला तिची अवस्था किती बिकट झाली असेल याचा काही विचार? तिच्या पतीला, मुलांना किंवा इतर नातेवाईकांना समाजात वावरताना किती अवघड परिस्थितीला तोंड द्यावे लागले असेल याचे काहीतरी भान ठेवायला हवे होते. उद्या समजा त्या कुटुंबापुढे काही सामाजिक समस्या उभ्या राहिल्या तर काय होईल ? इतके कशाला उद्या त्या नवरा बायकोत काही गैरसमज निर्माण झाले तर त्याला जबाबदार कोण? आपल्याकडे आंबट शौकीनांची काही कमी नाही. आपल्या हातात एक प्रभावी माध्यम आहे त्याचा वापर विचार करूनच करायला हवा. परदेशात असले कार्यक्रम धो धो चालतही असतील. पण आपल्याकडे काही संस्कृती आहे. काही सामाजिक बंधने आहेत. सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी यांच्यात फूट पाडून तरी चानल वाल्यांना काय मिळाले? काही गोष्टी अशा असतात की त्या झाकल्या गेल्या पाहिजेत. निदान त्यांची दूरदर्शन सारख्या माध्यमातून केली जाणारी प्रसिद्धी तरी थांबली पाहिजे. आपली संस्कृती जपण्याची आहे. उघडे पाडण्याची नाही. हा कार्यक्रम दबाव आणून बंद पाडायला हवा.