या विषयावर सलील वाघ म्हणतात, ' समलिंगी संबंध हे बेकायदेशीर नाहीत असा फतवा न्यायालयाने काढला. त्याने मिडीयामध्ये जो हर्षोल्हास पसरला तो पाहून निम्म्याहून अधिक भारत समलिंगी असून तो व्याकूळ होऊन या क्षणाची वाट पाहात होता असा भास निर्माण झाला. वैद्यकीय समस्येचं इतकं उदात्तीकरण होत असलेलं पाहून काही तरी काळंबेरं( कोलबेर नव्हे! हे आमचे चावट मन! असो, अस्थानी  विनोदाबद्दल क्षमस्व.) असल्याची पाल खरं तर विचारी मनामध्ये चुकचुकायला हवी. तशी ती चुकचुकणार नाही कारण विचारी लोकांनी लौकिक समृद्धतेचा आणि बेजबाबदारपणाचा ऍनेस्थेशिया घेतला आहे. तो ऍनेस्थेशिया ते दुसऱ्यांनाही देत आहेत.
भारतीय कुटुंबव्यवस्था ही भारतीय लोकशाहीप्रमाणेच एक फ्रॉड आहे असे मानणाऱ्यांची संख्या कमी नाही. आश्चर्याची गोष्ट अशी की अशी मानसिकता असणारेच त्या व्यवस्थांचा जास्तीत जास्त लाभ घेत असतात. एकत्र कुटुंबातून फुटून बाहेर पडणारी चंगळवादी जोडपी बाळंतपणासाठी किंवा आपत्तीच्या प्रसंगी आपल्या आईबापांना किंवा सासू-सासऱ्यांना अमेरिकेला (किंवा ते जिथं असतील तिथं) बोलावतात आणि त्याच चंगळवादी लाचारीतून हे सिनीयर सिटीझनही खुशीखुशी जातात. हे चित्र पुणे, मुंबई, नागपूर, कोल्हापूरपासून दिल्ली, पंजाब - भारतभर दिसते. आपले शोषण होऊ द्यायला उत्सुक अशी एक सिनीयरसिटीझनची मोठी फळी भारतीय समाजात निर्माण झाली आहे. तिच्या जिवावरच त्यांचे आणि बाकीच्या समाजाचे शोषण करायला सज्ज आणि दक्ष असलेल्या चंगळवाद्यांना मोकळे रान मिळत असते. कुटुंबव्यवस्थेतल्या या निर्नायकीला कुटुंबव्यवस्थेचा फील दिला की या शोषणाचे सामाजिक पैलू आपोआपच नजरेआड होतात. भारतातल्या लोकशाहीचे असेच एक प्रकारच्या फसवणूकशाहीत रुपांतर झाले आहे. भारतीयांच्या जगण्याचा आणि लोकशाहीचा संपर्क तुटलेला आहे (आणि जो आहे तो जेमतेम निवडणुकांपुरता मर्यादित आहे)
फसवाफसवीची लोकशाही, भरकटलेली कुटुंबव्यवस्था आणि विनोदी विवाहसंस्था यांच्या पार्श्वभूमीवर या समलिंग्यांच्या घटनेचा विचार करावा ला'गे'ल.  समलिंगी लैंगिक आकर्षण ही मुळात एक वैद्यकीय समस्या आहे. प्रत्येक व्यक्तीत समलिंगी प्रेरणा क्षीण प्रमाणात असतातच. जगण्याच्या ओघात त्यांचे दमन होत असते. तेही रास्त असते. आपापल्यातल्या अपप्रवृत्तींचे दमन न करता येणे हा आजार आहे. ( हा आजार राजकारण्यांपासून ते उद्योगपतींपर्यंत आणि कामगारापासून कलकारापर्यंत कोणालाही होऊ शकतो). भारतीय परंपरा ही विवाहपूर्व किंवा विवाहबाह्य संबंधाना अनभिज्ञ नाही. अपघात आणि आपत्कालीन व्यवस्था म्हणून समलिंगी संबंधांनाही एक कोपरा राखून ठेवला गेला आहे. वात्सायनांनी त्यावर लिहिलंय, खजुराहोपासून आसामपर्यंत सापडलेल्या शिल्पांमध्ये समलिंगत्वाचे थोडेथोडे पुरावे आढळतात. पण गेल्या काही वर्षांपासून ज्या पद्धतीने समलिंगत्वाचे उदात्तीकरण करून तिला 'मेनस्ट्रीम' केले जात आहे, ते बघता यापाठीमागे पाश्चात्य देशांच्या मार्केटिंगचे षडयंत्र आहे का याचा संशय घेणे जरुरीचे आहे.
युरोपीय, त्यातही इंग्रज लोक हे मुळात खलाशी. वर्षानुवर्षे ते समुद्रावर असत. तेथे स्त्रिया कुठून येणार? त्यामुळे पुरुषापुरुषांमधील लैंगिकसंबंधाना दृढता आणि मान्यता मिळत गेली. तीच दर्यावर्दी प्रथा संपूर्ण इंग्रज समाजात पसरली. रसेलनी त्यांच्या काळातल्या समलिंग्यांबद्दल लिहिले आहे. आज इंग्रज हे जगातले अव्वल आणि पट्टीचे समलिंगे मानले जातात. अरबस्थानातही जनानखान्यात पुरुषांचा तुटवडा असल्यामुळे तिथे बायाबायांमधले संबंध. पण हे झालं कोरड्या दुष्काळाबद्दल.  युरोपात दुसऱ्या महायुद्धानंतर, विशेषतः सत्तरीनंतरच्या दशकात  स्त्रियांचा पुरुषांना आणि पुरुषांचा स्त्रियांना ओला दुष्काळ पडला. या ओल्या दुष्काळातून रुचिवैचित्र्यासाठी समलिंगी संबंध ठेवणाऱ्या कडव्या स्त्रीपुरुषांच्या टोळ्या निर्माण झाल्या. पाश्चात्य देशात काही मूर्खपणाचं झालं की त्याचं श्रद्धेनं अनुकरण करण्याची शिस्त भारतीय समाजात आहे. लायकी नसलेल्या लोकांचा हाती नवश्रीमंतीनं पैसाही खुळखुळायला लागला. त्यामुळं समलिंगी संबंधांचं उदात्तीकरण भारतात सहज झालं. चेकाळलेल्या मिडीयामुळं तर भिन्नलिंगी आकर्षण असलेल्या आमच्यासारख्यांना जणू तोंड चुकवायची वेळ येते की काय, इतका अपराधीपणा आला.
न्यायालयाने समलिंगी संबंध हा गुन्हा नाही, असा निकाल दिला आहे. समलिंगी संबंध हे गौरवाचे आहेत किंवा सक्तीचे आहेत असा निकाल अजून दिलेला नाही. यापुढे न्यायालयांनी अशा प्रकारचा सामाजिकदृष्ट्या संवेदनशील निकाल देताना त्याला मिडीयातून मिळणाऱ्या प्रसिद्धीचेही काही नियम किणा दंडक त्या निकालातच घालून द्यायला हवेत. तसे झाले तर न्याययंत्रणेने निदान यात समाजहिताची जबाबदारी ओळखली असा त्याचा अर्थ होईल.
नाहीतरी आपण सगळे सण आणि डे विधिनिषेध न बाळगता साजरे करतोच. आता मग हे 'गे डे', 'गी डे' म्हणून साजरे करा. तो राष्ट्रीय सण म्हणून पाळा!
सलील वाघ यांचा संपर्क:

दुवा क्र. १