ज्योतिष हे शास्त्र आहे किंवा नाही, हा वादाचा भाग असेलही कदाचित, पण वैज्ञानिक संशोधनाचा विषय मात्र नक्कीच आहे. या संदर्भात मला सामाजिक शास्त्रांचे संशोधन ज्या मार्गाने केले जाते तो संशोधनाचा मार्ग उपयुक्त वाटतो. यांत विशिष्ट विषयावरील (उदा. विशिष्ट ग्रहस्थिती असताना विशिष्ट घटना घडणे ) संशोधन समाविष्ट होईल. ज्योतिषाच्या वेगवेगळ्या प्रवाहांमधूनही (रमल, हस्तसामुद्रिक, अंकशास्त्र वगैरे ) असा अभ्यास करता येईल. विशिष्ट ग्रहस्थितीच्या काळात पूर्वी घडलेल्या घटना तीच ग्रहस्थिती पुन्हा असताना तशाच घडतात का असाही शोध घेता येईल. हाच अभ्यास विशिष्ट ज्योतिषाच्या व्यक्तिगत संदर्भातही करता येईल. म्हणजे विशिष्ट व्यक्तीने सांगितलेल्या भाकितांपैकी कोणकोणती भाकिते खरी ठरली याचा चिकित्सक अभ्यास करता येईल.
मला स्वतः ला ज्योतिषातले काहीही समजत नाही, पण माझ्या जन्मतारखेशी व जन्म वेळेशी साम्य व केवळ स्थळभेद असणाऱ्या कोणाकोणाच्या पत्रिकेत कसा फरक पडतो व त्याचा ज्योतिष-विद्येतील कोणकोणत्या तत्त्वांशी कसा संबंध जोडला जातो तसेच प्रत्यक्ष भाकीत वर्तविण्यामध्ये काय फरक पडतो असा अभ्यास करण्याचा विचार केला होता. अर्थात ज्योतिषातले कळत नसल्याने नि पुरेशी माहिती मिळवता न आल्याने ते केवळ मनातल्या मनात खाल्लेल्या मांड्यांसारखे मनातच जिरून गेले. पण या विषयावर संशोधन व्हायला हवे एवढे मात्र निश्चित. केवळ अंधश्रद्धा म्हणून त्याकडे पाहता येणार नाही. ज्या गोष्टींचा काहीही उपयोग नसतो, त्या नैसर्गिक असो वा मानवनिर्मित, आपोआप नष्ट होत जातात. शतकानुशतके जर ज्योतिष टिकून राहत असेल तर त्यामागे काही ना काही तत्त्वे-सिद्धांत असायलाच हवीत असे मला वाटते.
सहज आठवले पण नेमका काल-संदर्भ देता येत नाही. पूर्वी पुण्याच्या दैनिक प्रभात मध्ये दर मंगळवारी सामाजिक व राजकीय भविष्य प्रसिद्ध व्हायचे, त्यांत शेवटी मागील भविष्याचा पडताळा हा स्वतंत्र मुद्दा असे. खूप दिवसांत मंगळवारचा प्रभात बघायलाच मिळाला नसल्याने आता हे सदर आहे की नाही हे माहित नाही.