प्रकाशजी,

या विषयावर प्रश्न विचारण्याची संधी उपलब्ध केलीत याबद्दल धन्यवाद.

फलज्योतिष हे प्रत्येक जन्मलेल्या व्यक्तीचे भविष्य सांगू शकते कारण प्रत्येक जन्म झालेल्या व्यक्तीची पत्रिका बनवता येते. असा फलज्योतिषशास्ताचा दावा असतो. साहजिकच प्रत्येक जन्मलेल्या व्यक्तिची मृत्युची नेमकी नाही तरी सर्वसाधारण वेळ सांगता यावी. किमान एखादी व्यक्ती किती वर्षे जगेल हे तरी सांगता यावे ही अपेक्षा. यात नैसर्गिक, अपघाती, घातपाती असे सर्व मृत्यू धरले आहेत कारण मृत्यू हा शेवटी मृत्यू असतो. म्हणून  या काही परीक्षा ...

१. जेव्हा एकाच वेळी मोठ्या प्रमाणात मृत्यू घडतात त्यावेळी मृत्यू पावणाऱ्या सर्वांच्या पत्रिकेत मृत्युयोग असेल?
उदा. ६ व ९ ऑगस्ट १९४५ ला अमेरिकेने जपानच्या हिरोशिमा व नागासाकीवर अणुबॉंबचा प्रयोग केल्यावर तत्क्षणी १ लाख लोक मरण पावले. यात अजन्म्या बालकांपासून वृद्ध व्यक्ती या सर्वांचा समावेश होता. लाखोनी मनुष्येतर सजीव ठार झाले ते वेगळेच. या सर्वांची जन्मवेळ अर्थातच भिन्न भिन्न होती. तरी एकाच वेळी ते सर्व का मृत्यू पावले? याचे समाधान फलज्योतिष देऊ शकते? हे त्या विशिष्ठ देशासाठी गंडांतर होते असे कारण नको. देशाचे फलज्योतिष जर व्यक्तीगत भविष्य़ावर कुरघोडी करत असेल तर मग व्यक्तीगत भाकितांना काही अर्थ उरणार नाही.
याचप्रमाणे भूकंप, त्सुनामी यात एकाच वेळी मारले जाणारे हजारो लोक.
स्कूलबसला अपघात होऊन मारली जाणारी एकाच वयोगटातील पण भिन्न जन्मवेळा असणारी मुले.
विमान, बस, रेल्वेअपघात होऊन मारले जाणारे प्रवासी. यात एक दोन वाचले तर ' जिसको राखे साइयां मार सके ना कोई' असे म्हणत केली जाणारी नशीब, दैव आणि देव व ज्योतिष यांची केली जाणारी भलावण.
२६ जुलै २००५ रोजी सुमारे ६० लाख मुंबईकरांना अतिवृष्टीचा फटका बसला. ते सर्व एकाच राशीचे होते का? सर्व १२ राशीचे लोक यात होते ना? की ज्योतिषांना यातून असे सांगायचे आहे की हो सर्वांनाच फटका बसला पण मेष वाले त्रस्त झाले होते, कन्या वाले काळजीत होते, मिथुन वाले मजा करत होते तर सिंह वाले मदत करत होते? यांचे काही सांगता येत नाही.  

२. आता याचा व्यत्यास. म्हणजे एकाच शहरात एकाच मिनिटाला जन्माला येणाऱ्या बालकांचे भवितव्य एकसारखे असते का? किंवा थोडक्यात अगदी समान पत्रिका असणाऱ्यांचे भविष्य एकच येते का?

३. जुळ्या मुलांचे भविष्य सारखेच असते का? जुळ्या मुलांच्या जन्मात १५ मिनीटांचा फरक असू शकतो. म्हणजे पत्रिका भिन्न असे काही नाही. अगदी तंतोतंत पत्रिका होऊ शकते. तरीही जुळ्या मुलांच्या स्वभावापासून त्यांचे पुढील सारे जीवन हे भिन्न असते. असे का?

४. सयामी जुळी: यात तर मुले आयडेंटीकल जुळी असतात. म्हणजे एकाच फलित बीजापासून अलग झालेले दोन जीव. पण एक किंवा अधिक अवयव सामायिक असल्याने एकमेकांना चिकटलेले. यांची तरी पत्रिका एकसारखीच हवी. पण इथेही काहीही एकसारखे घडत नाही. सयामी जुळे असले तरी प्रेत्येक जण स्वतंत्र व्यक्तीमत्तव घेऊन जगतो. दोघांची आवड वेगवेगळी असते. अर्थात एकाला मृत्यू आल्यास दुसरा काही तासात मरण पावतो कारण सामायिक ऑर्गन. म्हणूनच आज अशा बालकांना आधीच शस्त्रक्रियेने वेगळे केले जाते.

या सर्व प्रश्नाना  कृपया समाधानकारक उत्तरे मिळावित ही अपेक्षा.

अजूनही शंका आहेत. पण सध्या एवढ्याच!

धन्यवाद!

-मंदार