वाघीण
वाघीण समजायचो
मी तिला...
वाघीण...
स्वतःच्या धुंदीत जगणारी...
नजरेनं घायाळ करणारी...
कलंदर...
बिलंदर...
वाघीण ...
तिच्या नजरेनं
मीही घायाळ झालो
अन
फिरू लागलो...
अगतिकासारखा !
जणू...
ती माझी वाघीण
अन...
मी तिचा वाघोबा !
मला नव्हतं वाटलं
तिचे आसुसलेले ओठ
माझंच रक्त पितील,
अमानुषपणे...
तिचा जबडा
माझाच फडशा पाडेल,
अगदी...
अधाशासारखा
अन...
तिची नखं,
माझ्याच काळजात रूततील,
अगदी...
खेकड्यागत
खोलवर...
अगदी खोलवर...
मला नव्हतं माहीत
तिचे तीक्ष्ण दात,
माझ्याच गळ्यात घुसतील...
अन...
घोट घेतील...
कायमचा...
ती हिंस्रपणे
तुटून पडेल माझ्यावर...
दिवसेंदिवस...
भक्ष्य न मिळालेल्या
श्वापदासारखी
नव्हतं माहीत मला,
ती मला संपवेल
पण...
शेवटच्या क्षणी...
अगदी शेवटच्या क्षणी...
मला समजलं,
तिनं...
तिनंच हेरलं होतं मला...
एक...
एक सावज म्हणून !