आपण उपस्थित केलेल्या प्रश्नावर माझे उत्तर असे आहे.

सकारात्मक विचार म्हणजे आपल्या वाटणीला जी परिस्थिती आलेली असते तिच्यांतील अनुकूल व फायद्याच्या गोष्टी पाहणे. तसेच प्रतिकूल गोष्टींबद्दल काय करता येईल त्याचा विचार करणे.

नकारात्मक विचार म्हणजे परिस्थितींतील प्रतिकूल गोष्टी व अडचणींच लक्षात घेणे व निष्क्रीयपणे तिच्याबद्दल तक्रार करीत राहणे.

तुमच्या प्राचार्यांनी तुमच्या बाबतीत 'निगेटिव्ह थिंकिंग' या शब्दाचा केलेला वापर तितकासा बरोबर नाही. कदाचित तुम्ही अशा काही अडचणी सांगाल की त्यावर आपल्याकडे उपाय नसेल व आपली असमर्थता उघडी पडेल या भीतीने त्या डाफरल्या असण्याची शक्यता आहे. भीतीपोटी माणूस अधिकाराचा स्वसंरक्षणासाठी वापर करतो. जर तुम्ही सांगितलेली कोणतीही अडचण आपण सोडवू शकतो असा आत्मविश्वास त्यांना असता तर त्यांनी डाफरण्याऐवजी "तुम्ही सुरू तर करा. आल्याच काही अडचणी तर मी आहे" असे आश्वासन देऊन नंतर जरूर पडल्यास तुमच्या मदतीनेच त्या अडचणी त्यांनी सोडवल्या असत्या.

तुमच्यासाठी एक सल्ला : कधीकधी सुरवातीला एखादी गोष्ट करणे अशक्य आहे असे वाटते. अशा वेळी आपण आपले वय आठवावे. वय हे अनुभवाचे मोजमाप असते. इतका अनुभव असलेल्याला कुठलीही गोष्ट अशक्य वाटण्याचे कारण नाही हे आपल्या लक्षात घ्यावे. (हा वास्तववादी विचार आहे). कधीकधी अधिकारी व्यक्तीसमोर भीती विचारशक्तीवर मात करते म्हणून काही गोष्टी अशक्य कोटीतल्या वाटतात. आपल्याला असलेला अनुभव विचारशक्ती वापरू शकते. मग सुरवातीला (भीतीच्या अमलाखाली) अशक्य वाटणारी गोष्ट आपल्या हातून यशस्वीपणे पार पडते.

शक्य झाल्यास आपण Transactional Analysis चा अभ्यास करावा. त्यासाठी I'm OK - You're OK हे पुस्तक वाचावे. आपणास व्यक्तिगत मार्गदर्शन हवे असल्यास माझ्याशी संपर्क साधावा. माझा पत्ता : शरद कोर्डे, ५१ बी / ३२, वृंदावन, ठाणे - ४००६०१. फोन : २५४२९९५८ (मो) ९८३३५६६०२०.