मला हा प्रस्ताव पाहून थोडेसे नवल वाटले. होकारात्मक / सकारात्मक व नकारात्मक हे शब्द साधारण फील द्यायला पुरेसे वाटतात. ज्यात होकार आहे तो होकारात्मक विचार व नकार आहे तो नकारात्मक इतपत जाणीव व्हायला हरकत नसावी. तरीही, लेखकाचा पूर्ण आदर ठेवून मी असे म्हणेन की जर या संकल्पना 'खरोखर काय आहेत' असा आपल्याला प्रश्न असेल तर 'माझ्या कुवतीप्रमाणे' उत्तर देत आहे.

( हे उत्तर देताना आधीच, श्री. संजोपरावांशी असहमत आहे हे लिहितो. कारण त्यांनीच दिलेले उदाहरण मुद्दाम घेत आहे.)

याचे कारणः

एखाद्या ठिकाणी जर रोगाचा प्रादुर्भाव फार झाला असेल ( व ही बाब नकारात्मक आहे व असणारच ) तर 'औषधांना चांगली बाजारपेठ मिळवण्याची संधी' हा माझ्यामते त्यातील 'सकारात्मक' भाग अजिबात नाही. त्यातील सकारात्मक भाग हा आहे की :

१. झालेल्या प्रादुर्भावाच्या व्याप्तीचे पूर्ण ज्ञान असून त्यावरील उपायांचेही पूर्ण ज्ञान आहे व उपाय उपलब्धही आहेत.
२. इतरत्र हा प्रादुर्भाव होऊच नये यासाठी काय करता येईल याचे पुर्ण ज्ञान व साधने उपलब्ध आहेत.
३. या रोगामुळे होणारी सर्वोच्च हानी आता टाळता येत आहे.
४. सर्व जनता आता वेल-इंफॉर्म्ड आहे.
५. याच स्वरुपाचे आणखीन काही किटाणू / जिवाणू असू शकतील काय याचे संशोधन होऊ शकते व त्यातून समाजाला फायदा होऊ शकतो.

या माझ्यामते सकारात्मक बाबी आहेत. औषधांची बाजारपेठ प्रचंड वाढण्याची संधी हे 'वाइटातून चांगले काढणे' असावे.

सकारात्मक हा शब्द माझ्यामते 'वाईटातून चांगले काढणे' या अर्थाचा नसून 'विषयातील अजूनही उपस्थित असलेल्या किंवा नक्कीच होऊ शकणाऱ्या चांगल्या गोष्टींकडे पाहून आत्मविश्वास धारण करून त्यातील वाईट गोष्टी नष्ट करण्याचा प्रयत्न करण्याचा दृष्टिकोन अंगी बाणणे' होय!

धन्यवाद!