आजकाल स्टीलच्या ताटाच्या आकारात प्रेस केलेल्या (उंचावलेल्या कडांसकट) 'मार्डन' पत्रावळी मिळतात. त्यामुळे आमटीसारखे द्रवपदार्थ ओघळ काढत पत्रावळीबाहेर धावत नाहीत.
दक्षिणेत विशेषतः तामिळनाडूत बऱ्याच गावातल्या हाटिलात जेवण केळीच्या पानावरच मिळते. हे केळीचे पान इतके प्रिय की काही (८-१०) वर्षापूर्वी त्याचा मद्रास (चेन्नई) बाजारातला दर प्रत्येक पानाला रु.३ /- इतका होता. इतकेच काय पण त्रितारांकित हाटिलातल्या बोनचायना डिशमध्येही गोल कापलेले केळीचे पान ठेवून त्यावरून दोसा, उत्तपम वाढले जात असे.(अजूनही असावे. )
आणखी एक किस्सा.. एका अस्सल तमिळाबरोबर हाटिलात जेवल्यानंतर मी पान मुडपले. ते माझ्या बाजूस (मी जेवताना बसलेल्या बाजूस) न मुडपता वाढप्याच्या बाजूस (किंवा टेबलावर समोर बसलेल्याच्या बाजूस) मुडपले. त्यावर त्याने मला पुन्हा तसे न करण्याची ताकीद दिली. कारण विचारले तर तो म्हणाला - तसे करणे म्हणजे वाढणाऱ्याचा अथवा यजमानाचा अपमान समजला जातो. आपल्या बाजूस पान मुडपले तर - त्याचा अर्थ "तुम्ही आमचे" आणि विरुद्ध बाजूस मुडपले तर त्याचा अर्थ - " तुमचे आमचे पटणार नाही. "
साध्या केळीच्या पानास जेवण संपल्यावर कोणत्या बाजूस मुडपायचे हा शिष्टाचार मी त्यावेळी शिकलो.