श्रीनि,
ओशोंच्या पारमार्थिक अधिकाराबद्द्ल माझ्या मनात जराही किंतु नाही. तू लिहितोस की,
ओशो (रजनीश) म्हणतात (आणि जे मला पटते), की संतांनी ज्या सत्याबाबत आपले वक्तव्य दिले, ते सत्य त्या संतांना त्यांच्या शोधामुळे, त्यांच्या प्रयत्नांमुळे गवसले होते. पण नंतर, बर्‍याच लोकांनी, स्वतः शोध न घेता, संतांचे हे वक्तव्य 'सत्य' म्हणून स्वीकारले.

लोकांनी संतांचे वक्तव्य "सत्य"म्हणून स्विकारले पण त्याची अनुभूती घेण्याचे प्रयत्न केले नाहीत हा लोकांचा दोष आहे. संतांचा नाही. PhD करणे हा शिक्षणाचा अंतिम टप्पा असतो. पण कुणी एकदम PhD च्या वर्गात जावून बसतो का?म्हणून का अक्षरओळख करुन देणारे पहिलीचे वर्गच बंद करायचे?
तद्वत् संतांनी अंतिम सत्य जाणले तरी सर्वसामान्य माणसाला पारमार्थिक कसे बनविता येईल ह्याचा सखोल विचार केला होता. "देवाचिये द्वारी उभा क्षणभरी,तेणे मुक्ति चारी साधियेल्या " सांगणारे ज्ञानेश्वर महाराज हरिपाठाच्या शेवटी "रिकामा अर्धघडी राहू नको" हे सांगायला विसरत नाहीत. "हरी मुखे म्हणा,हरी मुखे म्हणा; पुण्याची गणना कोण करी" हे सांगणारे ज्ञानेश्वर आणि अमृतानुभवासारखा अजातवाद सांगणारा ग्रंथ लिहिणारे ज्ञानेश्वर एकच. पण "जैसा ज्याचा अधिकार तैसा करु उपदेश" हे फक्त संतांनाच कळत होते. "सुख पाहता जवापाडे;दु:ख पर्वताएव्हढे" म्हणणारे तुकाराम शेवटी "आनंदाचे डोही आनंद तरंग,गावू परमानंद मनासंगे" बोलू धजावतातच ना!
"ब्रह्म सत्य जगत मिथ्या" ही वेदांताची अनुभुती आहे. सत्य ह्या शब्दाचा अर्थ सातत्याने असते ते असा सांगितला जातो. मिथ्या म्हणजे जे परिवर्तनशील आहे ते किंवा neither real nor false असाही सांगितला जातो. लोकांनी साधक बनून नामाची कास धरावी आणि सत्यापर्यंत पोहचावे असाच संतांचा हेतू आहे.पण "कैसे हे आंधळे जन न देखती खर्‍या देवा"असे संतांना नाईलाजास्तव लिहावे लागते. सर्वसामान्य जनता साध्या-साध्या गोष्टीही करायच्या टाळतात.तरी संत उपदेश करण्याचे आपले कार्य सोडत नाहीत. कारण " बुडती हे जन न देखवे डोळा,हितांच्या कळवळा येतो त्यांच्या" हा संतांचा स्थायीभाव असतो.
संतांनी समाजाला निष्क्रिय केले ह्या म्हणण्याला काही अर्थ नाही. झोपेत असणारा मनुष्य लौकीक अर्थाने काहीच करत नाही.म्हणून त्याला कुणी झोपूच दिले नाही तर?तर तो उद्याचे कार्य व्यवस्थित करु शकेल का? वस्तुत: झोपेत असणारा माणूस उद्याच्या कार्यासाठी ऊर्जास्रोत गोळा करीत असतो हे आपण लक्षात घेतले पाहिजे.
मनाचे सामर्थ्य फक्त संतांनाच कळले होते.म्हणूनच "मन करा रे प्रसन्न सर्वसिद्धीचे कारण " हे तुकोबाराय सांगतात आणि "उन्मनीच्या सुखा आत पांडुरंग भेटी देत" हे सांगायलाही विसरत नाहीत.


"मीच्या वेलांटीचा सुटो-सुटो फास,वेढा क्षितिजास पडो त्याचा" हे लिहिणारे विं.दा. आणि "अहं ब्रह्मासी"म्हणणारे वेदांती ह्यांच्यात भेद तो कोणता ???