हा आजार / रोग गंभीर खराच, पण मिडिया आणि माणसंच त्याची गंभीरता आणखी भीतिदायक करीत आहेत. अनेक माध्यमातून या रोगासंबंधीच्या ज्या बातम्या वाचल्या त्यातून केवळ गांभीर्य वाढले. नेमकेपणा मात्र फारसा कळला नाही. उदा. या आजाराच्या लक्षणांसंदर्भात दोन उल्लेख पाहण्यात आले. यामध्ये एका रुग्णाला थंडी वाजून आली नि ताप भरला. त्यातून केलेल्या तपासणीमध्ये त्याला खरोखरच हा आजार झाल्याचे कळले. येथे थंडी वाजून येणे हे एक लक्षण ठरते. एका (नवग्रह) गणेशोत्सव मंडळाने लावलेल्या बोर्डवर (हाही एकप्रकारे मिडियाच) दिलेल्या लक्षणांमध्ये सौम्य ताप येणे असे नोंदवले आहे. सौम्य ताप येतो म्हणजे नेमका किती हे अज्ञातच आहे नि सौम्य ताप येतो तेव्हा थंडी वाजून येते का याचेही उत्तर (निदान माझ्याकडेतरी) नाही. या आजारात किती संशयित, किती रुग्ण, किती मृत याचीच चर्चा जास्त चालल्यासारखी दिसते. बऱ्या होणाऱ्या रुग्णांची नोंद आता पहायला मिळते आहे. जर हा आजार योग्य रितीने काळजी घेतल्यास बरा होऊ शकतो हे आधीपासून सांगितले गेले असते तर कदाचित रुग्णालयांमधील रांगांची लांबी कमी करता आली असती. तपासणी केलेल्यांची संख्या हजाराच्या घरात, संशयितांची संख्या शेकड्यामध्ये, रुग्णांची संख्या त्यापेक्षा कमी नि प्रत्यक्ष मृतांची संख्या पन्नासपेक्षाही कमी हा सारा प्रकार म्हणजे आजाराची लक्षणे नेमकेपणाने लोकांपर्यंत पोचवली न गेल्यामुळे झालेल्या गोंधळाचा परिणाम वाटतो. (मृतांची संख्या कमी याचा अर्थ हा आजार गंभीर नाही असे नाही तर तो असाध्य नाही हे लक्षात आणून देणे एवढ्याच पुरता मर्यादित आहे.)