या लेखाच्या निमित्ताने ही सगळी लेखमालिका पुन्हा एकदा वाचून काढली. हातात चहाचा कप, म्युझिक सिस्टीमवर लावलेलं संगीत, डोक्यावर फिरणारा पंखा या नेहमीच्या थाटात. या क्षणी येथून शे-दोनशे किलोमिटरवर कुणीतरी चादरीची झोळी करून एखाद्या आजारी, अत्यवस्थ, अपघातग्रस्त व्यक्तीला कैक किलोमिटर लांब असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात नेत आहेत, कुणी गर्भार महिला डोक्यावर एक आणि कमरेवर एक पाण्याची घागर घेऊन डोंगर उतरते आहे, कुणी अपुऱ्या दिवसांत जन्मलेलं मूल एखाद्या देवऋषापुढे शेवटचा श्वास घेत आहे... आणि या हजारो,लाखो थकलेल्या, हरलेल्या, भकास डोळ्यांच्या साक्षीने महाराष्ट्र विकासाच्या दिशेने घोडदौड करत आहे. 'विकास म्हणजे काय?' आणि 'मिनिमलिस्ट जगणं' हे प्रश्न बाण घुसावा तसे मनात घुसून बसले आहेत. उत्तरं अर्थातच नाहीत. (खुद्द लेखकाजवळच ती नाहीत, तर वाचकांचे काय!)
चटका बसावा असे लिखाण. इतर काहीही लिहिणे शब्दांचा अपव्यय ठरेल.
अवांतरः हे लिखाण प्रकाशित होऊन चोवीस तास झाले. हा पहिला प्रतिसाद. हेच लिखाण अन्यत्र प्रकाशित झाले आहे, तेथेही मोजके प्रतिसाद. (त्यातलेही काही लेखकाचा 'स्टॅमिना' 'खंग्री' असल्याबद्दलचे! ) कारण उघड आहे. या लेखांत 'मनोरंजक, चुरचुरीत' असे काही नाही. एक घाणेरडा शब्द वापरायचा तर हे 'डोक्याला कल्हई' करणारे लिखाण आहे. असले कोण वाचणार आणि त्यावर विचार तरी कोण करणार? 'त्याने आकाशाकडे तोंड करून गर्जना केली, 'बाप्पा तुला क्षमा नाही...' असे खानोलकरासारखे म्हणावेसे वाटते.
अति अवांतरः आंतरजालीय लिखाण गंभीरपणे घेण्याची पद्धत नाही. हे माध्यम अशा प्रकारच्या लिखाणासाठी योग्य नाही असे वाटते. चूभूदेघे.