पुणेकरांना या सकाळचे काय करायचे हा प्रश्न पडतो, तसा मुंबईकरांना महाराष्ट्र टाइम्स बद्दल पडतो. काही दिवसांनी केवळ क्रियापदे मराठी असलेले मराठी वर्तमानपत्र असे बिरुद मटाला मिरवता येईल. एखाद्याला कॉफी पिण्याची सवय असेल तर चहा पिऊन त्याची तलफ भागत नाही. मिळालेली कॉफी कितीही बेकार असली तरी तो ती पितो. तसेच मटाच्या वाचकांचे झाले आहे. आणि याचाच फायदा मटा घेतो. पूर्वी मटा संपादकांच्या नावाने ओळखला जायचा. भरतकुमार राऊत येई पर्यंत ही परिस्थिती होती. आता तर मटाला कुंकवापुरताही संपादक नाही. वरिष्ठ साहाय्यक संपादक पीआरबी कायद्यानुसार बातम्यांच्या निवडीसाठी जबाबदार. [इतर मजकुराची जबाबदारी कोणावर?] वरिष्ठ साहाय्यक संपादक हे पदनाम वापरणाऱ्यांना 'डेप्युटी एडिटर' साठी मात्र मराठी शब्द मिळत नाही. व्याकरण व शुद्धलेखनाची तर बोंब आहेच. पण मिलियन आणि बिलियनच्या आकड्यांचे भारतीयकरण करतानाही ते अक्षम्य चुका करतात. असो. संपादकाच्या ऐवजी वितरणव्यवस्थापकाच्या हाती सर्व सूत्रे असल्यावर दुसरे काय होणार? मटा केवळ एक उपयुक्त टाइम[स] पास; पत्र नव्हे; मित्रतर नव्हेच नव्हे !!