'सकाळ'बद्दल संजोप रावांची मते पटली.
साधारण १६-१७ वर्षांपूर्वी आम्ही देखील सकाळ घेत होतो. परंतु माझ्या वडीलांनी तो बंद करून 'लोकसत्ता' घ्यायला सुरुवात केली. तेव्हा माधव गडकरी लोकसत्ताचे संपादक होते. अर्थात, तेव्हा मी शाळकरी पोरगा होतो, अग्रलेख वगैरे फारसं कळत नसे. पण वडिलांनी मला अग्रलेख वाचण्याची गोडी लावली. संपादकांवरून तेव्हा वृत्तपत्र ओळखलं जात होतं. माधव गडकरी, अरुण टिकेकर अशा बुद्धिवादी संपादकांचे लेख आणि त्याच दर्जाच्या बातम्या वाचल्यावर सकाळ अगदीच मिळमिळीत वाटायला लागला. पण जे सकाळच्या बाबतीत झालं तेच लोकसत्ताच्या बाबतीतही झालं. फरक इतकाच की सकाळ राष्ट्रवादीने उघडपणे विकत घेतला, लोकसत्ता कॉंग्रेसने पडद्याआडून. कुमार केतकर लोकसत्ताचे संपादक झाले, आणि अत्यंत निष्पक्ष, निर्भिड असा नावलौकिक असणाऱ्या लोकसत्ताने कॉंग्रेसचे पोवाडे गायला सुरुवात केली. वाचकांना हा धक्का होता. पण आता तेच काय, अशुद्धलेखन देखील अंगवळणी पडले आहे. वैचारीक लेख हे लोकसत्ताचं वैशिष्ट्य होतं. आज सकाळच्या मानानं जरी उजवे असले, तरी अशा लेखांचं प्रमाण खूपच घटलं आहे. आता यापुढे कोणते वृत्तपत्र घ्यावे असा विचार मी करत आहे.
हे रामायण सांगण्यामागचा उद्देश असा, की आजच्या काळात कोणत्याही प्रसारमाध्यमाला (वृत्तपत्र, आकाशवाणी, दूरचित्रवाणी) तटस्थपणे काम करणे अशक्य आहे. लोकशाहीत प्रसारमाध्यमांचा प्रभाव सर्वात जास्त असतो. त्यांना हाताशी धरल्याशिवाय सत्ताप्राप्ती अशक्य आहे, हे बहुतेक पक्षांना उमगले आहे. त्यामुळे निष्पक्षपाती वृत्तपत्राची अपेक्षा आता सोडावी.
सकाळने, माफ करा..... राष्ट्रवादीने, आता वृत्तपत्र, मासिके, आकाशवाणी, दुरचित्रवाणी या सर्व माध्यमांचा वापर सुरू केला आहे. पैसा भरपूर असल्याने एकाचवेळी सर्व माध्यमांमध्ये प्रवेश करणे त्यांना फार अवघड नव्हते.
दर्जाबद्दल म्हणाल, तर माझे अगदी स्पष्ट मत आहे की सकाळ हे वृत्तपत्र वाचण्यालायक नाही. सुमार दर्जाचे लेख, आणि त्याहून सुमार दर्जाच्या बातम्या असूनही लोक हे वृत्तपत्र का घेतात हे एक नवलच आहे. परवाच सकाळच्या मुखपृष्ठावर एका परदेशी बाईचा मुलाला पाठीवर घेऊन जातानाचे चित्र होते. त्याखाली अशी काहीतरी ओळ होती, "...... पाहा, तो मुलगा किती आनंदाने ध्वजाकडे बघत आहे". प्रत्यक्षात चित्रातला तो मुलगा बथ्थड नजरेने बघत होता. वाचक अक्कलशून्य आहेत अशा भावनेने वाट्टेल ते छापले जाते. त्यामुळे सकाळ १०-१५ मिनिटांच्यावर वाचवत नाही.
सध्या मी दोन्ही वर्तमानपत्रे घेतो. लोकसत्ता वाचण्यासाठी, आणि सकाळ वित्रपट आणि नाटकांच्या जाहिराती पाहण्यासाठी. दुर्दैवाने लोकसत्तामध्ये फक्त मुंबईमधील जाहिराती येतात, त्यामुळे सकाळ घ्यावा लागतो (आणि थोडाफार वाचतोही). मात्र एकच बातमी दोन्ही वृत्तपत्रांमध्ये कशा पद्धतीने छापली जाते ते वाचून खरोखर मनोरंजन होते!