देणारा असा आपला लेख आहे. फक्त एकच गोष्ट पटली नाही
बरेच लोक सकाळी टेकडीवर किंवा लांब रस्त्यावर फिरावयास जात असतात., मग फिरून आल्यावर त्यांचा ग्रुप एकाद्या हॉटेलमध्ये एकत्र जमतो. मग सर्वजण नास्ता म्हणून डोसा, भजी, वडा, इडली सांबार याची ऑर्डर देतात व ते खाऊन घरी जातात. पण हे चुकीचे आहे. कारण तुम्ही फिरून आल्यावर जेवढ्या कॅलरीज खर्च केलेल्या असतात तेवढ्याच या खाण्याने परत मिळवता व सर्व फिरण्याची मेहनत तशी वाया जाते.
सकाळी टेकडी चढण्याचा व्यायाम झाल्यावर मग श्रमपरिहार म्हणून नाश्ता केला तर त्यात वाईट काय आहे? आता भजी, वडा अशा तेलकट पदार्थांऐवजी इडली, डोसा असे आरोग्यदायक पदार्थ खावेत असे म्हणणे असेल तर ते रास्त आहे. आणखी एक म्हणजे व्यायामाने कॅलरीज खर्च होतात त्या खाण्याने भरून निघतात यातही निसर्गविरुद्ध असे काय आहे? आजकालचे लोक (इतकेच कशाला वीस पंचवीस वर्षांपूर्वी मीसुद्धा) न्याहरी न करता थेट दुपारीच जेवतात. ते चुकीचे असून प्रत्येकाने न्याहरी केलीच पाहिजे असे आहारतज्ञ सांगत असताना सकाळी व्यायामानंतर न्याहरी करणे चुकीचे नाही.
दुसरे म्हणजे आजकाल अनेक डॉक्टर्स दोन बटाटेवडे खाल्ले तर इतकी मिनिटे चालावे लागेल, एक वाटी श्रीखंड खाल्ले तर इतके चालावे लागेल असे सांगताना दिसतात. माझ्या मते असे म्हणणे म्हणजे पेशंटच्या मनात अपराधीपणाची भावना निर्माण करणे आहे. प्रत्येकाने आपल्याला दिवसाला किती कॅलरीजची आवश्यकता आहे ते समजून त्याप्रमाणे आहार ठेवावा. त्याचप्रमाणे खाल्लेले नीट पचण्यासाठी व्यायाम करावा हे योग्य आहे.
शिवाय नुसत्या कॅलरी जाळणाऱ्या (एरोबिक्स) व्यायामाबरोबरच स्नायूबलसंवर्धन करणारा व्यायामही आवश्यक आहे.
आणखी एक महत्त्वाचा मुद्दा मधुमेह्यांच्या आहाराबद्दलचा. ठराविक प्रमाणाबाहेर कर्बोदके खाता येत नाहीत, स्निग्धांश जास्त असलेले पदार्थ जास्त खाऊ नका असे आहारतज्ञ सांगतात आणि एका प्रमाणाबाहेर प्रथिने खाल्ल्याने किडनीवर वाईट परिणाम होतो. मग मधुमेह्यांनी खायचे तरी काय?
साधे गणित मांडू. साधारण मनुष्याला दिवसाला २००० कॅलरीज आवश्यक आहेत असे आहारतज्ञ सांगतात. आपण सांगता त्याप्रमाणे दिवसाला फार तर २० ग्रॅम तेल = १८० कॅलरीज. दिवसाला ८० ग्रॅम पेक्षा जास्त प्रथिने खाल्ल्यास किडनीवर परिणाम होतो. त्यामुळे जास्तीत जास्त ८० ग्रॅम प्रथिने = ३२० कॅलरीज. एकूण ५०० कॅलरीज झाल्या. राहिलेल्या १५०० कॅलरीज कर्बोदकांमधून मिळवाव्या लागतील आणि त्यासाठी ३७५ ग्रॅम कर्बोदके खावी लागतील. इतक्या प्रमाणात कर्बोदके पचवण्याइतके इन्सुलीन मधुमेह्याचे स्वादुपिंड तयार करत नाही किंवा इन्सुलीन रेसिस्टन्समुळे ते वापरले जात नाही. त्यामुळे रक्तातली साखर ठराविक मर्यादेत राहत नाही. यावर उपाय काय?
तर माझ्या मते स्निग्धांश वाईट ही कल्पना, निदान मधुमेह्यांनी तरी, मनातून काढावी. आपल्या शरीराला दिवसाला किती कर्बोदके पचवता येतात हे थोडासा प्रयोग करून ठरवावे, साधारण ८० ग्रॅम प्रथिने दूध, अंडी, डाळी, मूग, मटकी, चवळी, अशी कडध्यान्ये यातून मिळवावीत आणि बाकी कॅलरीजची कमतरता स्निग्धांशाने भरून काढावी.
डॉ. रिचर्ड बर्न्सटीन यांनी स्वतःचा टाईप१ चा मधुमेह दिवसाला फक्त ३० ग्रॅम (किंवा त्यापेक्षाही कमी) कर्बोदके खाऊन (बाकी अर्थातच स्निग्धांश आणि प्रथिने) ताब्यात ठेवला. आपल्यासारख्या शाकाहारी लोकांना इतका टोकाचा आहार शक्य नसला तरी वरच्याप्रमाणे प्रयोग केला तर फायदा होऊ शकेल.
विनायक
जाता जाता - हा लेख सर्वसामान्य मनुष्याच्या आहाराबद्दल आहे त्यामुळे मधुमेही मनुष्याच्या आहाराचा विषय आणून थोडेसे विषयांतर केले आहे तरीही आपण पूर्वाश्रमीचे मधुमेही म्हणून समजून घ्याल अशी अपेक्षा आहे.