ठेविले अनंते तैसेची राहावे, हे तत्त्वज्ञान आपण नाकारले पाहिजे. कारण त्यामुळेच माणूस स्थितीशील होतो आणि मग दैव, प्रारब्ध यावर हवाला ठेऊन आपल्याच पायात साखळी बांधून घेतो. हे वाक्य एकदा मनाने स्वीकारले की मग न्यूनगंडही सिद्धांत बनू लागतात. म्हणून स्त्रियांनी हार मानू नये. मी एक इतिहासातील घटना नमूद करतो. पेशव्यांचे निस्पृह न्यायाधीश रामशास्त्री प्रभुणे यांच्यापुढे एका बाईचा खटला आला होता. धर्मग्रंथाच्या दाखल्यांवर त्याचा निर्णय त्या बाईविरूद्ध गेला. हताश झालेल्या त्या स्त्रीने विचारले, ' शास्त्रीबुवा! बायकाही जो धर्म निष्ठेने पाळतात तो त्यांच्यावर बंधने का लादतो?' त्यावर रामशास्त्री उत्तरले, ' बाई याला आपला नाईलाज आहे. कारण हे धर्मग्रंथ पुरूषांनी लिहिले आहेत. '

म्हणून मला वैयक्तिक असे वाटते, की स्त्रियांनीच आता वर्षानुवर्षे त्यांना पराधीन करत आलेले हे तत्त्वज्ञान नाकारावे आणि फेरमांडणी करावी. मी एक साधासा प्रश्न विचारतो, की किती स्त्रिया जशा मुलींना स्वयंपाक शिकवतात, तशा मुलांनाही स्वयंपाक आणि घरकामांसाठी प्रोत्साहन देतात.? समानतेचे पहिले बाळकडू इथेच दिले गेले पाहिजे. आपणच पुरूषांना वर्चस्ववादी बनवायचे आणि नंतर त्याचविरूद्ध गाऱ्हाणे गायचे, हे कधी थांबणार?

लोकप्रतिनिधी म्हणून बायका निवडून येतात आणि त्यांच्या आडून त्यांचे वडील, नवरा, सासरे, दीर आणि मुलगे आपल्या सोयीचे राजकारण करतात. तिथे का नाही ती स्त्री त्यांना स्पष्टपणे सांगत, 'तुम्ही यात लक्ष घालू नका. ' कुटुंबात कुणीही पुरूष स्त्रीवर अन्याय करत असेल, तर इतर स्त्रिया का नाही तिच्या बाजूने उभ्या राहात? कारण आपली जीवनप्रणालीच सोयीपुरते पाहाण्याची झाली आहे. त्यात न्याय आणि समानतेला जागा आहेच कुठे? पण मी आशावादी आहे. आधुनिक महिला हे चित्र नक्की बदलेल.