श्री. प्रदीप
तुमचा मुख्य वाद श्री. संजोप रावांनी लिहिलेल्या मताशी असला तरी कपूर खानदानाच्या शिक्षणाच्या बाबतीत मी रावांशी सहमती दर्शवल्याने या बाबतीत माझे स्पष्टीकरण देणे योग्य समजतो. जे लोक गरिबीमुळे शिकू शकले नाहीत जसे दोन्ही माडगूळकर, बहिणाबाई त्यांच्या कमी शिक्षणाचा तुच्छतापूर्वक उल्लेख कोणीही सूज्ञ करणार नाही. कपूर खानदानाच्या बाबतीत सांगायचे तर स्वतः पृथ्वीराज कपूर मध्यम परिस्थितीतून वर आले तरी ते बी. ए. शिकले होते. त्यानंतर राज, शम्मी, शशी, रणधीर, ऋषी, आणखीही इतर कपूर लोकांना न शिकण्याचे काय कारण होते? राज कपूर तरूण असतानाच वाया गेलेला म्हणून पृथीराज कपूरने त्याचा नाद सोडला होता. त्यावेळी केदार शर्मांनी पहिल्याने सहाय्यक दिग्दर्शक आणि नंतर "बावरे नैन" चा नायक म्हणून संधी दिली नसती तर काय झाले असते? शशी कपूरला मुलींची टिंगल केल्यामुळे कॉलेजमधून रस्टिकेट केले होते. अशी परिस्थिती असताना शिरीष कणेकरांनी, संजोप रावांनी किंवा मी त्यांच्या शिक्षणाबद्दल (किंवा त्याच्या अभावाबद्दल) तुच्छतेने लिहिले तर काय चुकले?
आता विषय निघालाच आहे तर आणखी एका व्यक्तीबद्दल लिहितो. साहिरच्या शिक्षणाबद्दल लिहिताना माधव मोहोळकरांनी त्याला १९४३ साली कॉलेज सोडावे लागले इतकेच लिहिले आहे. त्याच्यामागची खरी हकीकत आमच्या ग्रुपच्या एका मीटिंगमध्ये समजली. साहिर गव्हर्नमेंट कॉलेज लुधियानाचा विद्यार्थी. त्याच कॉलेजमध्ये शिकलेल्या आणि आज सत्तरीत असलेल्या लोकांकडून समजलेली ही हकीकत. त्याच कॉलेजमध्ये शिकणाऱ्या एका मुलीवर साहिरचे प्रेम होते. तिचे बहुधा नव्हते. तिने एकदा प्रिन्सिपॉलकडे तक्रार केल्यावर साहिरला नुसते ताकीद देऊन सोडण्यात आले. पुन्हा साहिरने प्रेम व्यक्त केल्यावर तिच्या घरचे लोक, जे श्रीमंत होते, त्यांनी तक्रार केली. प्रिन्सिपॉलने त्या दोघांना ऑफिसात बसवून परत साहिरला ताकीद दिली तेव्हा साहिरने तिथल्या तिथे तिला
फिर ना कीजे मेरी गुस्ताख निगाही का गिला
देखिय आपने फिर प्यारसे देखा मुझको
असे सुनावले. त्यानंतर प्रिन्सिपॉलने ताबडतोब साहिरला रस्टिकेट केले. आता ही गोष्ट साहिरच्या कवित्वाची साक्ष देणारी असली तरी शिक्षण अर्धवट सोडावे लागले याबद्दल सहानुभूती वाटावी अशी नक्की नाही असे मला तरी वाटते.
विनायक