मुळात हे असले निराशावादी विचार करणे हीच फार मोठी चूक आहे. आशावादी राहा.
एक गोष्ट सांगतो. एका रेल्वेतून एक साधू आणि एक मुलगा चालले होते. ती रेल्वे एका पुलावर येई तेव्हा दुसरी एक रेल्वे तिला क्रॉस करून जाई. याही वेळी पूल जवळ आला तसा तो मुलगा वैतागला. साधू म्हणाला, 'बाळा का चिडतोस? ' तर मुलगा उत्तरला, ' महाराज मी एकदा या गाडीतून या पुलावरून एक सुंदर दृश्य पाहिले होते. मोठी नदी. त्यात नावा. मासे पकडणारे कोळी. बगळ्यांचा थवा. मी दर वेळेस हा पूल आला, की ते पुन्हा पाहाण्याचा प्रयत्न करतो, पण नेमकी ती दुसरी गाडी क्रॉस होते. जीवनात असे का होते? '
त्यावर साधू हसला आणि म्हणाला, 'आता असं कर. पूल येईल तेव्हा या खिडकीशी बसूच नकोस. पलिकडच्या बाजूच्या खिडकीशी जा. बघ काय दिसतंय? ' त्या मुलाने ती खिडकी उघडली नि काय दिसले? हिरवेगार कुरण, त्यात चरणारी गुरे. झाडाखाली बासरी वाजवत विसावलेला गुराखी. मुलगा देहभान विसरला. मग साधूने मुलाच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाला, 'बाळा. चिडायचं नाही. आयुष्यातील एक खिडकी बंद झाली तर दुसरी उघडायची. '
मला वाटतं तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळावे.