आपण दिलेली परापूजा छान च आहे.
आम्ही साताऱ्याला खिंडीतील गणपती येथे खालील परापूजा म्हणतो.

चराचरी तू आवाहन हे काय तुझ्या कामी?
सकलाधारा द्यावे तुजला काय आसना मी ?
स्वच्छ जो, तया केले ठरती अर्घ्य-पाद्य वाया,
कर वाहेना आचमन तुला शुद्धाला द्याया ।

घालू कैसे तुला निर्मला देवा स्नानाते,
विश्वोदर तू, तुला वहावा पट कवण्या हाते?
निरालंब तू, उपवीताचे महत्व का तूते?
गंधाची थोरवी काय तुज, नसे लेप ज्याते ।

नसे वासना, फुले सुवासिक सुवास का तुजला?
स्वतः रम्य तू, फिकी तुजपुढे पडे रत्नमाला,
निर्गंधव्या सिगंधित कशी ही द्रव्ये तुजसी
धूपातीता प्रसन्न कैसा धूपे तू होशी ?

तेजोरूपी विश्वदीप तू, धूपदीप तुजसी,
भक्तजनांच्या आर्ता हराया आर्तिक्ये होसी
सदा तृप्त तू, नैवेद्याची काय तुला वाणी,
कर्माकर्म स्वयं फलदका सेवू सुखदा मी ।

विभो तुष्ट तुज कसे करावे म्या तांबूलांनी?
विश्वश्रीला कैसे रिझवू स्वर्णदक्षिणांनी?
नसे अनंता प्रदक्षिणेचे बळ माझे ठायी
अगम्य पद तव, मग कैसे म्या लागावे पायी?

तुजला स्तविता हात टेकिले जेथे वेदांनी,
कशी टिकावी तेथे वाणी मम बापुडवाणी,
स्वयंप्रकाशा काय तुजपुढे नीरांजन ज्योती?
विसर्जन तुला कोठे? विश्वे नांदविसी पोटी ।

कळोनि सारे सजलो देवा तुझ्या पूजनासी,
भय न लेकरा वाटे जाया निजजननीपाशी ।
चुकले मुकले शब्द मुलाचे गोडचि जननीते,
बालिश लीला बघूनी तिच्या मनी हर्ष वाटे ।

अजाण मी लेकरू, तुजकडे जननीचे नाते,
तव सेवेचा ओढा देवा असो मात्र माते ।
होइल तैसी करितो सेवा, गोड करुनि घ्यावी,
आत्मपदाची जोड मोरया निजभक्ता द्यावी ।
आत्मपदाची जोड मोरया निजदासा द्यावी ॥

॥मंगलमूर्ती मोरया॥