खरंतर डोळ्यानां दिसतं म्हणण चूक आहे तुम्ही डोळ्यातून पाहता म्हणून तुम्हाला दिसतं. डोळे साधन आहेत, तुम्ही प्रमुख आहात. पण आपण शरीराशी इतके एकरूप झालो आहोत की प्रत्येक दृष्टीहीन 'मला' दिसत नाही असं म्हणतो. डोळ्याना दिसत नाही हे ज्याला कळतं ते तुम्ही आहात हे पहिल्यांदा लक्ष्यात घेतलं पाहिजे.

डोळ्यानी तुम्ही आकार पाहू शकता तसा निराकार देखील बघू शकता पण डोळ्यांचा वापर सारखा आकारच बघण्यासाठी केला जातो त्यामुळे निराकाराकडे (स्पेस) दुर्लक्ष होते.  फक्त एकदा तुम्हाला निराकार दिसला की तुमच्या अध्यात्मिक प्रवासाला सुरूवात होते. मग तुमच्या हे लक्ष्यात येतं की निराकार फक्त बाहेरच नाही तर तो आत पण आहे. जसे कॅन्व्हास शिवाय चित्र काढता येणार नाही तसा प्रत्येक आकाराच्या प्रकटी करणाला निराकार लागणारच. तो आभासात्मक नाही तर आकारापेक्षाही सार्वभौम आणि कायमचा आहे. आकार निर्माण होतील आणि विलीन होतील पण निराकार आहे तसाच राहील. निराकार अनिर्मीत आहे त्यामुळे निराकार कसा अस्तित्वात आला असेल हा प्रष्ण निरर्थक आहे.

हा निराकाराचा बोध तुम्हाला स्वतः पर्यंत आणतो, तुम्हाला मग लक्ष्यात येतं की आपणही निराकारच आहोत कारण शरीर स्थिर असताना आपण शरीराच्या आत आहोत की बाहेर हे नक्की सांगता येत नाही,  याचं कारण आपण शरीराच्या आत आणि बाहेर दोन्हीकडे आहोत. निराकाराला भासमान म्हणण म्हणजे स्वतःला नाकारणं आहे हे ज्या क्षणी तुमच्या लक्ष्यात येईल त्या क्षणी तुमच्या सगळ्या विवंचना दूर होतील आणि हे जीवन आनंदाचा उत्सव होईल.

संजय