सच का सामना हा कार्यक्रम द मोमेण्ट ऑफ ट्रुथ नावाच्या अमेरिकन कार्यक्रमावर आधारित आहे.
सनी यांनी दिलेल्या उदाहरणांचा विचार करू. तुम्ही आयुष्यात चोरी केली आहे?, बायको शिवाय तुमचे बाहेर प्रकरण सुरू आहे?, तुम्हाला अनौरस संतान आहे?. दुसऱ्याची ईस्टेट हडपली आहे? तुम्हाला लग्नाआधी मुलं झालंय? नालायकपणा केल्यामुळे तुम्हाला शाळेतून काढून टाकले आहे? नवऱ्याशी अनेक वेळा बेवफाई केली आहे? इ. ज्या प्रकारच्या प्रश्नांशी हा कार्यक्रम निगडित आहे त्यातल्या अनेक प्रश्नांचा संदर्भ स्त्री-पुरुष संबंध किंवा थोड्या व्यापक प्रमाणात व्यक्ति-व्यक्तींतील संबंध यांच्याशी जोडलेला असतो.
आणि या बाबतीत अमेरिकन आणि भारतीय समाजाच्या मानसिकतेत अजून तरी बराच फरक आहे. त्यामुळे अशा प्रकारचा "सच का सामना" करूनही अमेरिकेत अनावश्यक बदनामी होत नाही. मात्र भारतात ती मोठ्या प्रमाणात होते. या एका कारणास्तव असे कार्यक्रम समाजास पोषक नाहीत असं मला वाटतं.
कावळा यांच्याप्रमाणेच मीदेखील हा कार्यक्रम एकदाही पहिलेला नाही. पण त्याचे प्रोमोज आणि वृत्त्वाहिन्यांवरील गोंधळ मात्र पाहिला आहे. त्याआधारे हा कार्यक्रम टुकार आहे याबाबत मी कावळा यांच्याशी सहमत आहे.
कावळा यांच्या या असल्या कार्यक्रमातून त्या सुत्रधाराला काय साधायचे आहे ते समजत नाही या विधानाचा विचार मात्र थोडा मानसशास्त्रीय दृष्टीकोणातून करावासा वाटतो.
माणूस हा स्वभावतः स्खलनशील / पतनशील असतो. त्याच्याकडून लहान / मोठ्या चुका किंवा पापे ही होतच असतात. कुठेतरी त्या चुकांचा / पापांचा सल त्याच्या मनात असतोच. आपल्याप्रमाणेच दुसराही चुकतो, घसरतो, पायरी सोडतो, हे कळलं की माणसाला बरं वाटतं. ज्या चुका आपण कधीही केल्या नाहीत अशाही चुका इतरेजन करत असतात ही जाणीव आत कुठेतरी सुखावह असते. त्यातही प्रसिद्ध / यशस्वी व्यक्तींच्या आयुष्यातील पतनाचे क्षण जेव्हा सामान्यांना दिसतात तेव्हा त्या प्रसिद्ध / यशस्वी व्यक्तीबद्दल वाटणारी एक सूक्ष्म असूया सुखावते. आपण त्या व्यक्तीप्रमाणे यशस्वी होऊ शकत नाही याचा सल थोडा कमी होतो. किंवा असल्या भानगडी करून पचवण्याची आपली वृत्ती नाही म्हणूनच आपण असे मागे राहिलो आणि खरंतर तेच बरं आहे असं स्वतःला समजावण्याचाही उद्योग मानवी मन करत असतं.
म्हणूनच दुसऱ्याला उघडं पाडणाऱ्या अशा कार्यक्रमांना बेसुमार लोकप्रियता लाभत असते. पर्यायाने त्या कार्यक्रमाशी भरपूर पैसा जोडलेला असतो. आणि हे सूत्रधारालाच नव्हे तर निर्माता, दिग्दर्शक, प्रायोजक, वाहिनीसंचालक वगैरे सगळ्यांनाच पक्कं ठाऊक असतं आणि म्हणूनच असे कार्यक्रम निर्माण होतात, आणि वाढत जातात.
जाता जाता :-
या कार्यक्रमात स्वतःचे (? ) पितळ उघडे पाडणाऱ्या व्यक्ती अभिनय करत असाव्यात आणि वस्तुतः असे प्रसंग त्यांच्या आयुष्यात आलेलेच नसावेत असा मला दाट संशय आहे. कारण या कार्यक्रमात स्वतःचे (?) पितळ उघडे पाडणाऱ्या प्रसिद्ध व्यक्तींना तर काही केलं तरी लोक आपल्याला सेलिब्रिटी असल्यामुळे माफ करणार ह्याचुई सवय असतेच, इतरांना अभिनयाचे पैसे मिळाले की काम झालं! अस आपलं मला वाटतं!