नुसतेच शुद्धलेखन नाही तर व्याकरणही चुकीचे असता कामा नये. शुद्धलेखनासाठी अरुण फडक्यांची पुस्तके समोर ठेवून लिखाण करावे. त्यांचे एक खिशातले 'शुद्धलेखन ठेवा खिशात' पण आहे.
तुमच्या वरच्या लिखाणातल्या त्रुटीः 'मी लिहायला सुरू केले' नाही तर, मी लिहायला/लिहिण्यास सुरुवात केली. किंवा, मी लिहणे सुरू केले.लिहिताना हवे, लिहीतांना नको. (मराठी शब्दातल्या उपान्त्यपूर्व अक्षराचा इकार-उकार ऱ्हस्व असतो). भरपुर(x); भरपूर(शुद्ध मराठी अकारान्त शब्दातला उपान्त्य इकार/उकार दीर्घ.) चुका हा शब्द स्त्रीलिंगी; त्यामुळे ते चुका टाळण्याचा नको, त्या टाळण्याचा हवे.
मनोगतावर शुद्ध शब्दांचा एक कोश आहे, तो वापरावा. शिवाय येथे लिहिताना आपोआप टंकलेखन सुधारणा करणारा शुद्धिचिकित्सक चालू ठेवावा.
लिहिलेले परत एकदा ऱ्हस्व-दीर्घ उच्चारांसह वाचा, नव्वद टक्के चुका लक्षात येतील. त्या सुधारा आणि मगच लेखन सुरक्षित करा.
आपल्या ब्लॉगला माझ्या शुभेच्छा!