प्रामाणिकपणे सांगतो की बाराखडीच्याच दृष्टिकोनातून आधिचा प्रतिसाद दिला होता. माझे बाराखडीचे आकलनच चुकीचे असल्यास क्षमस्व!

कुठल्या कुठे मज फेकले आहेस तू !

किंवा असे, मज पेरले आहेस तू !

पहिली ओळ स्वच्छ वाटली. दुसऱ्या ओळीतील 'मला पेरले आहेस' चा संबंध 'मला फेकले आहेस' शी कसा काय आहे ते समजले नाही. मला जे समजले नाही, जे वाटले ते प्रामाणिकपणे लिहिले. 'फेकले आहेस किंवा पेरले आहेस' असा शब्दप्रयोग ऐकलेला नव्हता. फेकले आहेस किंवा तुच्छ लेखले आहेस, फेकले आहेस किंवा रेटले आहेस, फेकले आहेस किंवा पुरले आहेस' असे अपेक्षित होते. अर्थातच, मला काही 'वाटणे' याबाबत विविध प्रतिक्रिया येऊ शकतात व त्यांचा आदर आहेच!

बाराखडी - शेरातील दोन्ही ओळींचा परस्परांशी संबंध असलाच पाहिजे. शेर म्हणून परस्परांशी संबंध नसलेल्या दोन सुंदर ओळी एकत्र लिहिल्या म्हणजे शेर होत नाही. शेरात जे सांगायचे आहे, त्याची प्रस्तावना पहिल्या ओळीत असते, तर दुसरी ओळ म्हणजे पहिल्या ओळीतील प्रस्तावनेचा प्रभावी समारोप असतो.

उगवून मी येईन ही खात्री तुला...?
आव्हान हे का पेलले आहेस तू ?

समजलेला अर्थ - (वरील चर्चा वाचण्याआधी समजलेला! ) मी तुझ्या आयुष्यात / एकंदरच माझ्याही आयुष्यात कधीच सक्रीयपणे येणार नाही. तू मला डिवचून उगीचच नाही ते आव्हान पेलत आहेस. यात 'उगवून मी येईन' ऐवजी 'उगवेन मीही एकदा' जास्त स्पष्ट 'वाटले' असते.

बाराखडी - शेर सहज कळावा आणि ऐकणाऱ्याच्या किंवा वाचणाऱ्याच्या थेट हृदयात शिरावा, अशी शब्दाची मांडणी असावी. जणू आपण बोलत आहोत, असा शेर असावा. सोपेपणा हे यशस्वी शेराचे रहस्य होय.

चुपचाप तू ऐकून घे आता मला
मौनास माझ्या छेडले आहेस तू !

चुपचाप या शब्दात भांडण्याची छटा आहे. दटावण्याची छटा आहे. कवीने कुठलीही छटा आणावी. पण त्या छटेचे समर्थन व्हावे अशी अपेक्षा! दटावताना दटावण्याइतके काय झाले आहे हे बघायला गेल्यावर 'माझ्या मौनाला छेडलेस' ही ओळ येते. माझ्या मौनाला छेडलेस, आता गप्प बसून ऐकून घे - अशी ही द्विपदी आहे. यात एक असमर्थनीय दटावणी आहे असे 'वाटले'.

बाराखडी - गझलेची भाषा तिच्या पिंडाला मानवणारी असावी.


ओझे अपेक्षांचे दिले माझ्या शिरी...
अन् मोकळे तुज ठेवले आहेस तू  !

दिले दिले() नाही केले तर मला काही प्रॉब्लेम नाही.

घेतली माझ्या शिरी मी एवढी ओझी कुणाची ?
का असे आयुष्य हे माझे मलाही भार व्हावे  ? 


(हा प्रदीपजींचाच एक जुना अत्यंत सुंदर शेर सहज उदाहरण म्हणून दिला आहे. )

आपुलिया बळे - कवीचे दुःख विश्वाच्या दुःखाचे प्रतिनिधी असते. हा शेर निश्चीतच तसा 'वाटला' आहे.

वेड घेणे, उल्लेखणे व मनाला वेढणे यात आशयाचे साधर्म्य 'वाटले'.

माझी मते पुर्वग्रहदुषित असण्याचे मुळात काही कारणच नाही. अगदी पहिल्यापासूनच मी श्री. प्रदीप कुलकर्णींच्या अनेक गजलांवर नकारात्मकच प्रतिसाद देत आलो आहे.

याचे मला वाटणारे एकमेव कारणः

प्रदीपजींच्या गजलांच्या आशयामध्ये 'मी असा, तू असा' यावर प्रचंड भर मला सुरुवातीपासूनच जाणवलेला आहे. आशयात 'मी' व 'तू' यांच्या सातत्याने येणाऱ्या टीकात्मक / वेदनात्मक उल्लेखाने मला असे प्रतिसाद द्यावेसे वाटले आहेत.  असेच उल्लेख असलेल्या गजला करणे या कवीच्या स्वातंत्र्याची मला पुर्ण कल्पना आहे. तितकीच कल्पना, 'मला माझी मते मांडायला स्वातंत्र्य आहे' याचीही आहे. (मी असा तू असा - याबाबतीत माझे कुठलेही गैरसमजही नाहीत याची आपल्याला खात्री असावी अशी इच्छा!)

कदाचित नोंद होईल की त्यांच्या अनेक गजलांवर / ओळींवर  मी बेसुमार प्रेमही करतो.

कवितेने दिले (संपूर्ण गजल)
जन्म चकव्यासारखा ( संपूर्ण गजल) (उकिडवा हा शेर तर लाजवाबच)
वजन एखादे नवे (बरेच शेर)
वर्तुळाबाहेर माझ्या ( चकाकी / कात व अज्ञात हे शेर)
कधीतरी चांदण्यात दोघे ( हातचा हा शेर अफाट )
केवढे लाचार व्हावे ( मतला व वारंवार हा शेर अतिशय सुरेख)

एकंदर, काही विशिष्ट बाबतीत काही विशिष्ट मते स्वीकारार्ह नसावीत असे माझे मत बनू नये ही इच्छा!

क्षमस्व!

तसा मी कधीपासुनी तोच होतो
खरे सांगण्याने अविश्वास झाले - बेफिकीर!