हिंदी चित्रपटांच्या सुवर्ण युगात काव्याला महत्त्व होते. त्या काळातील गीतकारांत शैलेंद्र व साहिर हे अग्रगण्य होते. अशा ह्या अतिशय गुणी गीतकाराच्या गीतांच्या काही गहिऱ्या छटा विनायकांनी ह्या सुरेख लेखात फारच छान उलगडून दाखवल्या आहेत. शैलेंद्रच्या अत्यंत गाजलेल्या गाण्यांवर खूप लिहून झालेले आहे, तेव्हा ते टाळून त्याच्या इतर मनास थेट भिडणाऱ्या गीतांचा परामर्ष अत्यंत अभ्यासू वृत्तिने घेतला आहे. 'भयभंजना' मधील ओळींचे 'दुर्गे दुर्गट भारी'शी असलेले साधर्म्य दर्शवणे येथपासून त्याच्या शेवटच्या काळातील गीतावर पसरलेला पूर्वी कधीही न दिसलेला कडवटपणा... सगळेच निर्दश अत्यंत आनंददायी आहेत.
अनेकदा काव्यातील शब्द आपल्याला का भावतात, हे सांगता येणे कठीण आणि खरे तर अनावश्यकही. शैलेंद्रच्या 'मेरे मन के दिये' मधील 'आग के फूल आँचल मे डाले हुवे, कब से जलता है वो आसमाँ देख ले' ही ओळ मला नेहमीच खुणावून जाते. त्याचप्रमाणे 'कितने बहानोंसे, दिलकश तरानोंसे, आवाज तेरी बुलाए' ह्यातील दिलकश ह्या शब्दावर मी लुब्ध आहे.
'मिला है किसी का झुमका' वरील लेखाची आता अपेक्षा आहे.
हा लेख त्या थोर गीतकारास समर्पक श्रद्धांजलीच आहे, असे म्हटले तर ते वावगे ठरू नये.