विनायक, सत्याचा शोध आणि त्यावरील रजनीशांचे विचार हा मुद्दा मला महत्वाचा वाटतो कारण तो माझ्या मते 'संतांचा उपदेश' या विषयाशी निगडीत आहे. तेव्हा तो मी बाजूला ठेवणार नाही, अर्थात तुम्हाला तो महत्वाचा वाटत नसेल तर त्यावर काहीही टिपण्णी न करण्यास तुम्ही स्वतंत्र आहात.
विनायक आणि दंतकर्मी, बहुदा तुम्हा दोघांनाही माझा मुद्दा कळलेला नाही, तेव्हा तो स्पष्ट करायचा आणखी प्रयत्न करतो.
संतांच्या अभिव्यक्तीचे प्रामुख्याने दोन भाग पडतात. १) त्यांनी लोकांना केलेला उपदेश, उदा. 'मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धींचे कारण'.
२) त्यांना कळलेल्या सत्याची त्यांनी केलेली अभिव्यक्ती. उदा. 'अणुरेणूया थोकडा, तुका आकाशाएवढा'.
आता सामान्यतः जे लोक संतांचा उपदेश अंगिकारतात, ते लोक संतांची सत्याभिव्यक्ती देखील स्वतःची म्हणून अंगिकारतात. संतांचा उपदेश स्वीकारायला काहीच हरकत नाही, पण जर त्यांची सत्याभिव्यक्ती डोळसपणे, एक हायपोथेसिस, म्हणून न स्वीकारता 'प्रमाणभूत सत्य' म्हणून स्वीकरली, तर त्यामुळे सत्याचे वस्तुतः आकलन न होताही सत्य कळल्याचा आभास निर्माण होतो आणि मनुष्याची वाढ खुंटते.
आता या माझ्या मुद्द्यात मी संतांना कुठे दोष दिला आहे ? किंवा त्यांनी समाज निष्क्रीय केला असे कुठे म्हणालो आहे ? माझा मुद्दा याच्या अगदी विरुद्ध आहे. स्वतः काहीही प्रयत्न न करता दुसर्यांची तयार उत्तरे स्वतःची म्हणून स्वीकारणे हा अर्थातच तसे करणार्या लोकांचा दोष आहे, संतांचा नाही.
अगदी याच कारणाकरता, जर कुणी मला विचारले, की काय रे, आत्मा असतो की नसतो, तर मी म्हणेन की गीतेत आत्मा आहे असा उल्लेख आहे, पण मी स्वतः याबाबत जाणले नसल्याने मला माहीत नाही. शिवाय, जोपर्यंत मी स्वतः जाणत नाही, तोपर्यंत अगदी भगवान श्रीकृष्णांनी सांगितले असले तरीही, आत्मा आहे असे मी स्वीकारु शकत नाही. आत्म्यापर्यंत पोचण्याचा एखादा मार्ग अनुसरुन जर मला आत्म्याची अनुभूति आली तरच मी यावर बोलू शकेन, आणि मग तेव्हा मी हेदेखील सांगू शकेन की कृष्ण बरोबर आहे की चूक; कारण तेव्हा मी स्वतः जाणलेले असेन. वेदांच्या 'ब्रह्मसत्या जगन्मिथ्या' किंवा 'अहं ब्रह्मास्मि' बद्दल देखील हेच म्हणता येईल.
सारांश, माझ्या म्हणण्याचा रोख संतांच्या अभिव्यक्तीवर नसून ती अंधपणे स्वीकारणार्या लोकांवर आहे. इत्यलम.