'उगवणे' ह्या शब्दाचे उलगडणे, उकलणे हेही अर्थ असतात हे खरे आहे. पण तुम्ही जी वाक्यरचना वापरली आहे त्यानुसार ते लागू होऊ शकतात का?
- लागू होऊ शकतात, असे मला (विनम्रपणे) वाटते.

- "उगवून मी येईन" हा बोलणार्‍यासाठी ऍक्टिव वॉइस व 'ति'च्यासाठी पॅसिव वॉइस होतो.
'उलगडून/उकलून मी येईन तुला' असे म्हणाल्याने तुम्हाला अभिप्रेत अर्थ निघत नाही. त्यासाठी 'उगवेन मी तुला' (पक्षी : उलगडेन/उकलेन मी तुला)  असे वाक्य योजावे लागेल.
- उगवेनचा अर्थ इथे उकलेन असा घ्यावा. समजेन असाही घेता येईल...
एखादे कोडे उकलून येत नाही, एखादा माणूस आपल्याला समजून येत नाही, एखादीचे वागणे लवकर उलगडून येत नाही, असे अनेकदा म्हटले जाते. त्याच धर्तीवर उगवेन हा (उगवून मी येईन,  ही अर्धओळ) शब्द मी वापरलेला आहे.

'आव्हान' शब्द वापरल्यानंतरही 'उगवून मी येईन' ची सांगड जोडता येत नाही.
- मी (कधीकाळी का होईना) उगवून (उलगडून येईन, उकलून येईन, समजून येईन)  येईन, याची वाट पाहण्याचे आव्हान तू का पेलले आहेस, असा साधा-सोपा प्रश्न मला इथे विचारायचा आहे.

निवेदकाला 'उगवणे/उकलणे/उलगडणे' हे तिच्यासाठी आव्हान असू शकते कारण त्यात तिने काहीतरी ऍक्टिव्हली करणे अभिप्रेत आहे. पण निवेदकाच्या आपसूक उगवून येण्यात तिला काय आव्हान ?
- मी उगवून (उलगडून, उकलून, समजून) येईपर्यंतच्या  अनिश्चित काळासाठी वाट पाहत राहणे, हे तिला आव्हान(ात्मक)  वाटू शकते.

हे लिहिताना सुचलेला आणखी एक अर्थ,  उगवणे या शब्दाच्या नेहमीच्या अर्थानेः त्याचे आजवरचे आयुष्य बरड, नापीक जमिनीत, माळरानावर गेलेले आहे. (त्याला त्याच्या मनाजोगे, हवे तसे कधीच उगवता, बहरता आलेले नाही.) पण आता आपल्या सोबतीने त्याच्या मनाला अंकुर फुटण्याची शक्यता निर्माण झालेली आहे, (असे तिला वाटत आहे) आणि तसे ती त्याला बोलून दाखविते... पण त्याच्या मनातून त्याचा गतकाळ सहजासहजी पुसला जात नसल्याने, काही केले तरी आपण उगवून येऊच शकणार नाही, असे त्याला वाटत आहे... आणि हे तिच्यापुढे आव्हान असू शकते. (तो उगवून येईल, फुलेल, बहरेल याची वाट तरी किती पाहायची ? आय़ुष्यभर ?)

निवेदकाचे 'उगवून येणे' तिचा काहीही हातभार लागल्याविना / सहभाग असल्याशिवाय घडणारी गोष्ट आहे.
- त्याचे उगवून येणे ही गोष्ट तिच्याबाबतीत घडेलच असे नाही. (तरीही घडू शकेल, असे तिला वाटत आहे) आणि हेच तिने नकळतपणे पेललेले आव्हान होय. (त्याच्या स्वभावाचे नीट आकलन न झाल्यामुळे)

तेव्हा तुम्ही हे जे दोन अर्थ सांगितले आहेत ते तुम्हाला अभिप्रेत असले तरी तुमच्या वाक्यरचनेतून प्रतीत होत नाहीत.
-आता, या खुलाशानंतर, मला अभिप्रेत असलेला अर्थ तुम्हाला प्रतीत होईल, असे वाटते.

सविस्तर ऊहापोहाबद्दल मनापासून आभार. लोभ आहेच; असाच राहू द्यावा.

आपला,
प्रदीप कुलकर्णी