राजे अनेकवचनी, म्हणून शहाजीराजे अनेकवचनी. महाराज अनेकवचनी, पंडित आदरार्थी बहुवचनी, मत, तसे, हवे, ते(संस्कृत), निर्णय एकवचनी, परंतु मते अनेकवचनी.  मराठा, मालुसरा, भोसला एकवचनी, त्यामुळे पोवाड्यातील उल्लेख एकवचनीच असणार.

आणखी एक: भारतीय विद्वान बहुवचनी, परकीय एकवचनी. न्यूटन, ऍरिस्टॉटल, प्लेटो एकवचनी परंतु दत्तो वामन पोतदार, शंकराचार्य, मध्वाचार्य अनेकवचनी. आकारान्‍त/ईकारा‍न्त नावाच्या सुगम संगीत गाणाऱ्या गायिका, लता-आशा-उषा-मीना-प्राजक्ता-विभावरी एकवचनी. शास्त्रीय संगीत गाणाऱ्या हिराबाई, मोघूबाई बहुवचनी. आकारान्‍त पुरुष(रामा-शिवा-गोविंदा) एकवचनी वगैरे वगैरे. सर्व खेळाडू खेळताहेत तोपर्यंत एकवचनी, बुजुर्ग झाले की योग्यतेप्रमाणे बहुवचनी. सचिन आणि लता एकवचनी कारण 'प्रेम' नव्हे तर व्याकरण.

सिराज‌उद्दौलाला किंवा औरंगजेबाला कुणी आदरार्थी उल्लेखत असेल तर तशी त्यांची संस्कृती आहे असे समजावे.  उत्तरेतल्या सुसंस्कृत कुटुंबात पाळण्यातल्या तान्ह्या बाळालासुद्धा 'आप' म्हणतात.  आपल्याकडे सासरच्या कुत्र्याला अहो हाड् आणि मांजराला अहो शुक् करतात; चारपाच वर्षे वयाच्या (चुलत-मामे)सासऱ्याला अहो मामंजी. 'अहो भावजी, शी झाली, उठा नि  xxx धुवायला चला' हे वाक्य पूर्वी घरांघरांतून ऐकू यायचे.