एखादा संत अथवा गुरु आपल्याला कितपत प्रामाणिक वाटतो, यावर आपण त्याचा उपदेश स्वीकारायचा कि नाही ते ठरवतो. यात काही वावगे नाही असे मला वाटते. पण जेव्हा तो संत त्याचा सत्याकडे जाण्याचा मार्ग सांगतो, आणि मग सत्य काय ते सांगतो, तेव्हा, १) तो मार्ग स्वतः चालून त्याचा शेवट, त्या संताने सांगितलेल्या सत्यातच होतो का, हे पडताळून पाहणे , आणि २) त्यात होणारे कष्ट टाळण्याकरता तो संपूर्ण मार्गच टाळून त्याने सांगितलेले सत्य आपले म्हणून स्वीकारणे, या दोन्ही भिन्न गोष्टी आहेत.
माझा १) ला अजिबात विरोध नाही, कारण त्यात माणूस आपल्या अनुभवानेच जातो, आणि एखादेवेळी गुरु चुकीचा असेल तर असा शिष्य तसे सांगूही शकतो. माझा वैयक्तिक विरोध २) ला आहे, कारण या मुळे स्वतः न अनुभवता सत्य समजल्याचा भ्रम निर्माण होतो. त्यामुळे त्या व्यक्तीची वैयक्तिक हानी तर होतेच, पण अशी व्यक्ती प्रभावी असेल तर इतर अनेक सत्यशोधकांना ती आपल्याबरोबर खड्ड्यात घालू शकते, आणि त्यामुळे त्या प्रमाणात समाजाचीही हानी होते; कारण समाज व्यक्तींमुळे बनतो, तेव्हा व्यक्तीची हानी ही काही प्रमाणात समाजाचीही हानी आहे.
जाताजाता, आपल्या 'तो मुद्दा तूर्त बाजूला ठेवू' या वाक्यामधला आज्ञावजा आग्रहीपणा खटकला, म्हणून मी तो पहीला परिच्छेद लिहीला, इतकेच.