डोक्यावरती पंखा रोरावत असतो
मी मिटून डोळे कविता जागत असतो

- मिटून डोळे कविता जागणे... सुंदर कल्पना.


पाऊस रांगडा कुठे बरसतो हल्ली ?
(तो रिमझिम रिमझिम पाट्या टाकत असतो )

- वा...वा... रिमझिम रिमझिम पाट्या टाकणे...खूप आवडले. वेगळाच बाज.

बाजूला येतो कुणी, पाहतो, हसतो
इतक्यात अचानक सिग्नल लागत असतो !

- सुरेख. हा अनुभव तर प्रत्येकालाच बहुधा रोजच येत असावा. साध्या विषयाचा छान वापर.

जे म्हणायचे अंधूक जाणवत असते
तान्हुला कुणी आईस चाचपत असतो

- अप्रतिम. तान्हुल्याने जसे आईला हलकेच चाचपावे, तसे मनाने एखाद्या कल्पनेला अंदाज घेण्यासाठी चाचपावे...! छानच.

येणारच नसते गाडी कुठली, कोणी
नुसताच फलाटावर रेंगाळत असतो

- सुंदर. अतिशय सूक्ष्म, बारकावा टिपणारा शेर.

मी कधी रिकाम्या दुकानातला नोकर
एकटा स्वतःशी उगाच हासत असतो

- नवी कल्पना राबवावी, तर अशी. फारच छान.

अंधारच असतो ह्या खोलीत परंतू
एखादा क्षण घनदाट उजाळत असतो

- वा...वा...

मी आधी करतो आभाळाची माती
ती माती मग मी भाळी लावत असतो

- ओहो. अप्रतिम. खरोखरच कळसाध्यायाचा शेर.

एकंदर, अभिनव कल्पनांची खणखणीत गझल.
सौ सुनार की इक लुहार की, या म्हणीचा प्रत्यय तुमच्या गझला वाचून नेहमीच येतो.  असा प्रत्यय वारंवार यावा !