वर्तमानपत्रे हे समाज प्रबोधनाचे साधन समजण्याचा काळ मागे पडलाय. हे माध्यम आता संपूर्ण व्यावसायिक झाले आहे. म्हणजे आपण उपभोक्ता आणि ते रोजच्या वापरातील एक उत्पादन एवढा साधा हिशेब आहे. पूर्वी वर्तमानपत्रांत मुद्रित शोधकांच्या कामाचे महत्त्व मानले जायचे. संगणकावर लेखन व पान लावणे, कॉंप्युटर टु प्लेट (सीटूपी) तंत्रज्ञान, वेगवान ऑफसेट यंत्रे यामुळे वर्तमानपत्रांतील काही विभाग अस्तंगत झाले. जुळाऱ्यांची गरज संपली. मराठीसाठीही शुद्धलेखन चिकित्सा (स्पेल्चेक) सुविधा आल्यानंतर मुद्रितशोधन विभागातील कर्मचारी संख्या हळूहळू घटते आहे. आता तर व्यवस्थापनाला डीटीपी ऑपरेटरही नको आहेत. बातमीदाराने आपली बातमी संगणकावर तयार करावी ती उपसंपादकाकडे ऑनलाईन पाठवावी. त्याने ती थेट पानात लावावी आणि तयार झालेले पान सीटूपी तंत्रज्ञानाने थेट प्लेट बनवायला.

इकडे पत्रकारांचे काम वाढले. त्यात अतिरिक्त जबाबदाऱ्या गळ्यात पडतात आणि पगार अनाकर्षक (इंग्रजी वर्तमानपत्रांतले पगार मात्र भरभक्कम आहेत). याचा परिणाम असा झालाय की वर्तमानपत्रांतील बातमीदार, उपसंपादक यांना कामाबाबत आस्था राहिलेली नाही. नोकरी टिकेल की नाही याची शाश्वती नाही, तर भाषेची काळजी कोण करत बसणार हो? मग होतात रोज खंडीभर चुका. बरं वाचक काही शुद्धतेचा फार आग्रह धरणारे नसतात. ज्यांना काळजी वाटते ते करतात नापसंतीचे फोन आणि वाचकांचा पत्रव्यवहार, पण त्याकडे कुणी लक्ष देत नाही. अगदीच अंगावर शेकणारी चूक झाली तर दुसऱ्या दिवशी दिलगिरीच्या दोन ओळी कुठल्यातरी आतल्या पानात टाकल्या जातात.

मराठी भाषेची अवस्था दयनीय आहे, यात शंकाच नाही. त्यातून भाषेचे पावित्र्य जपण्याचा मक्ता केवळ वर्तमानपत्रांनी घेतलेला नाही. शाळेत मराठी शिकवणारे आताचे शिक्षक, प्राध्यापक यांची भाषा पहा. सरकार दरबारची भाषा बघा. मराठी साहित्यात काय दर्जाची भाषा येतेय ती पाहा. जनसामान्यांच्या तोंडातली भाषा बघा. आपले आपल्यालाच समजून येईल. मात्र दिलीप सामंत म्हणतात तशी स्थिती इतकीही हाताबाहेर गेलेली नाही, की आपण हताशपणे नुसते बघत बसावे. अनेक संस्था मराठीसाठी अपार कष्ट घेत आहेत. त्यांना अर्थसाह्य केले तरी पहिले पाऊल उचलू शकू.

अजून लिहिण्यासारखे खूप आहे, पण ते प्रसंगानुसार.

माझे मत एवढेच की वर्तमानपत्रांकडून फार अपेक्षा ठेवण्यात अर्थ नाही.