मराठी भाषेची गरज काय? मराठी संस्कृती, वाङ्मयाची गरज काय? मराठी संकेतस्थळे कशाला हवीत? 'आमच्या हिच्या अळूच्या भाजीची चव कश्शाकश्शाला येणार नाही' या वाक्याचे इंग्रजी भाषान्तर करता येत नाही? अशी वाक्ये बोलूच नका! सव्वाशे म्हणता येत नाही? वन् हन्ड्रेड् ऍन्ड ट्वेन्टिफाइव्ह् म्हणा. कसे 'ईझी' वाटते! जगात एकच भाषा, एकच लिपी आणि एकाच प्रकारचे अंक ठेवा. नव्याचे नऊ दिवस याऐवजी नाइन्चे नाइन् दिवस म्हणा.
खरोखरच सूचना फार चांगली आहे. मग आनंदात साजरे करायचे मराठी सण कशाला हवेत! धाय मोकलून रडायचे गुड्फ़्रायडे आणि मोहर्रम यांसारखे दिवस पाळू या. हिंदू तिथ्या, शक, संवत्सरे हवीत कशाला? इसवी सन आहे ना? भले, यंदा गुड्फ़्रायडे आणि ईस्टर किती तारखेला येतो, हे सांगता का येईना. (ईस्टर २६ मार्चपासून २३ एप्रिलदरम्यानच्या कोण्याएका रविवारी येतो. गुड्फ्रायडे त्याच्या दोन दिवस अगोदर. नक्की तारीख आधी सांगता येत नाही. ईदच्या दिवसाप्रमाणे ही तारीखही वाटाघाटीने ठरते!) दसऱ्यानंतर दिवाळी केव्हा येते हे लहान मुलालाही माहीत असते.
मराठी अंक नाही, म्हणजे मराठी पाढे नाहीत. पाचन्चारनऊन्आठसतरा त्रिक एक्कावन्न हे नाही. नकटीच्या लग्नाला सतराशेसाठ विघ्ने असल्या म्हणी नाहीत. विचार करा, दुहेरी उभ्या रेघांच्या जोडीमध्ये हिंदू आकड्यांत छापलेले श्लोकांक असलेली ज्ञानेश्वरी वाचताना कसेसेच नाही होणार? अंकीं पावणेबारा लिहायचे असेल तर काय । । । । । असे लिहिणार? 'पुढील मजकूर 17 व्या(सेव्हनटीनव्या?) पानावर हे वाचायला कसे वाटते?
आपली मातृभाषा आणि तिची लिपी आपली संस्कृती असते. त्या लिपीत लिहायचे आकडेसुद्धा. त्यामुळे ललित, धार्मिक आणि सांस्कृतिक लेखनासाठी मराठी अंक वापरा. वर्तमानपत्र आपली संस्कृती जिवंत ठेवण्याचे एक सहज मिळणारे, रोजच्या वापरातले साधन असते. तिथेतरी मराठी अंक वापरू या.