भारत स्वतंत्र होण्यास जी कारणे आहेत त्यात दुसरे महायुद्ध हे एक कारण असले तरी भारताच्या स्वातंत्र्याचे श्रेय मात्र हिटलरसारख्या मानव जातीला कलंक असलेल्या क्रूरात्म्याला देणे चुकीचे ठरेल. हिटलरची भारताच्या स्वातंत्र्याला फारशी सहानूभूती नव्हती. नेताजी सुभाषचंद्र बोस यांना हिटलरसोबतच्या चर्चेत ते लगेच लक्षात आले. जर्मनांनी सुभाषबाबूंना जपानला पाणबुडीतून नेऊन पोचवले एवढेच काय ते साह्य केले. पण जर्मन हाच आर्यवंश, बाकी सारे कमअस्स्ल, हीच भावना हिटलरच्या मनात होती. त्या कमअस्स्ल समूहांत भारतीय आलेच.
महायुद्धामुळे ब्रिटनची अर्थव्यवस्था दुर्बळ झाली आणि पूर्वीप्रमाणे वसाहतींवर अंकुश राखणे त्यांना अवघड झाले. त्यातच ब्रिटीश मतदारांनी चर्चिलला निरोप देत मजूर पक्षाला सत्तेवर आणले. मजूर पक्षाची वसाहतींना स्वातंत्र्य देण्यास सहानुभूती होती. म्हणूनच त्याची परिणती भारत स्वतंत्र होण्यात झाली. इतरही अनेक कारणे आहेत.
आता जर हिटलर महायुद्ध जिंकला असता किंवा चर्चिल पुन्हा सत्तेवर आला असता तर भारताला स्वातंत्र्य मिळाले असते का? या प्रश्नाचे उत्तर 'नाही' असेच येते. जर्मनांनी युद्ध जिंकले असते तर आपले नवे मालक ते झाले असते. बाकी गुलामगिरी सुरूच राहिली असती. आणि चर्चिलचे भारतीयांबाबतचे मत तर प्रसिद्ध्च आहे. स्वातंत्र्य देण्याची भारतीयांची लायकी नाही, असे तो म्हणत असे.
पण मला नवल एका गोष्टीचे वाटते, की या सगळ्याचे एवढे लिखित पुरावे व अभ्यास साधने असताना आजही कुणाच्या मनात ही शंका कशी येऊ शकते?