भारतीय साहित्य संग्रहाच्या वर दिलेल्या दुव्यावर उदंचनची व्युत्पत्ती उद् +अञ्ज् या धातूपासून झाली आहे असे दिले आहे, हे पटण्यासारखे नाही. अञ्ज्( अनक्ति, अनक्ते) या सातव्या गणातील धातूचे अर्थ माखणे, लेप करणे, अंजन घालणे असे आहेत. या धातूला उद् हा उपसर्ग लागत असल्याचे कधी ऐकले नाही.
उदंचनमध्ये अच् (किंवा अञ्च्) हा पहिल्या गणाचा धातू आहे. याची तृ.पु.ए.व.रूपे अचति-ते, अञ्चति-ते अशी होतात. अर्थ हिंडणे, जाणे, सरकणे, वाकवणे, पूजा-सत्कार करणे वगैरे. यांतले सरकणे हा अर्थ आपल्या सोईचा. या धातूला उद् लागल्यानंतर उदचन आणि उदंचन ही रूपे होतात. अर्थ वर येणे, (शिवाय वर करणे/काढणे). म्हणजे आपल्याला हवा तसा. महाराष्ट्रात हा शब्द लिफ्ट इरिगेशनच्या संदर्भात वापरतात. तिथे ते पाणी पंपाने उचलून कालव्यात सोडतात.
उदंचनच्या विरुद्ध अवांचन झाला असता, अवंचन नाही. परंतु, अव +अच्/अञ्च् या धातूपासून अवाच् हे विशेषण बनते. त्या विशेषणाचे अर्थ खाली वाकलेले, खालचा, दक्षिणेकडचा असे होतात. आणि अवाची म्हणजे दक्षिण दिशा, पाताळ. असे असूनही नव्या अर्थाने, खाली सरकण्यासाठी अवांचन वापरण्यास प्रत्यवाय नसावा. शिवाय नि + अञ्च् पासून न्यंचन होतो, अर्थ खाली जाणे. आणि परांचन=परत जाणे. त्यामुळे मी आधी सुचवलेल्या वरशिंदण-खालशिंदण या जोडीपेक्षा उदंचन-अवांचन, उदंचन-न्यंचन किंवा उदंचन-परांचन या जोड्या अधिक स्वीकारार्ह.