'डस्ट बनी'चा अमेरिकन हेरिटेजमध्ये दिलेला (इन्फ़ॉर्मल म्हणजे अनौपचारिक, नियमानुसार नसलेला) अर्थः कातडी, केस यांसारख्या सुक्या वस्तूंच्या कोरड्या कणांचा स्थैतिक विद्युत्मुळे बनलेला गोळा. (डस्टबनीचे अनेकवचन दिलेले नाही. या उलट टमी(इन्फॉर्मल)चे टमीज हे अनेकवचन देऊन पोट हा अर्थ दिला आहे.) त्यामुळे असे वाटते की डस्टबनी(ज़्?) म्हणजे आपले जळमट नाही. मेरियम वेबस्टरमधला अर्थ देखील डस्ट म्हणजे धुळीशी संबंधित आहे. इतर (ऑक्सफ़र्ड, कॉलिन्स, वेबस्टर आणि अशाच बऱ्याच) कोशांत डस्टबनी मिळाला नाही. मोल्सवर्थचा कोश जळमटचा संबंध जळलेल्याशी लावतो. आपण (कोळ्याच्या)जाळ्याशी. जळकट, कळकट, अरबट, चरबट, जळमट मधले कट, बट, मट हे प्रत्यय म्हणजे संस्कृतमधील 'कुत्सितार्थे डाच्' सारखे. ते लावून आपण कुत्तरडा, शिंपुर्डा म्हणतो आणि मूळ शब्दाच्या अर्थाला हीनत्व देतो. कोळ्याने त्यागलेल्या तुटक्यामुटक्या जुन्या जाळ्यात पिठाचे कण, कापडाचे तंतू आणि रज:कण चिकटून तयार झालेली तुच्छ वस्तू म्हणजे(माझ्या मते) जळमट..
कोळिष्टक म्हणजे देखील कोळ्याचे वापरात नसलेले अर्धेमुर्धे जाळे किंवा त्याचे उरलेसुरलेले तंतू. कोळ्याने कष्ट करून बांधलेल्या देखण्या जाळ्याला कुणी कोळिष्टक म्हणत नाही. इथेही 'क' हा कुत्सितार्थे डाच् सारखा प्रत्यय. मोडलेला फोनो आणि मोड'का' फोनो यांत जो फरक आहे तोच कोळ्याचे जाळे आणि कोळिष्ट'क'मध्ये आहे.
अर्थात ही माझी मते, सर्वांना मान्य होतील असे नाही. शब्दकोशातले अर्थ पटत नसतील तर ते स्वीकारायलाच पाहिजेत असे नाही!