द्वारकानाथ, महेश, पेठकर, माधवराव, भोमेकाका, विनायक, भाष,
आपण सर्वांनी ह्या विषयात दाखवलेल्या स्वारस्याबद्दल धन्यवाद. माधवराव, आपण वीरकरांच्या कोषात वगैरे पाहिले म्हणजे हे फारच झाले! त्याबद्दल विशेष आभार. भोमेकाका, "धडासुद्धा असू शकेल" हे आपण नाकारत नाही हे पाहून फारच बरे वाटले.
मला स्वत:ला ते धडा असेल असे वाटते याची दोन कारणे आहेत. पहिले म्हणजे मी तसेच शिकले आहे. दुसरे म्हणजे 'पाणी' शब्दाबद्दल बोलताना आपण तांब्याभर, बादलीभर, कळशीभर, घागरभर म्हणतो, डबाभर म्हणत नाही. कारण 'डबा' हे पाणी साठवण्यासाठी सर्वसाधारणपणे वापरले जाणारे भांडे नाही. जास्त अचूक बोलायचे असेल तर आपण २ लिटर पाणी, १० लिटर पाणी असे म्हणू. म्हणजे पाण्याचे माप वापरू. त्याच न्यायाने आपण तेल घडाभर म्हणणार नाही कारण घडा हे तेलासाठी सर्वसाधारणपणे वापरले जाणारे भांडे नाही. तेलाचे स्टॅंडर्ड भांडे म्हणजे बुधला किंवा बरणी. तेव्हा तेलाबद्दल बोलताना तेलाचे भांडे किंवा तेलाचे माप वापरले जाणे जास्त सयुक्तिक नाही का?
माझा असा तर्क आहे की धडाभर लिहिलेले कुणीतरी वाचताना चुकून घडाभर वाचले कारण दोन अक्षरांच्या दिसण्यातील साम्य आणि धडा शब्द फारसा परिचित नसणे. त्यामुळे अर्थाच्या दृष्टीने फारसा फरक पडला नाही, अतिशयोक्ती जास्तच अतिशयुक्त झाली आणि ते तसंच चालू राहिलं.
माझ्या माहितीतील एक 'मेधा' नावाची मुलगी आहे. ती आषाढात जन्माला आली म्हणून आईने हौसेने तिचे नाव 'मेघा' ठेवले. पण शाळेत ते 'मेधा' असेच लागले कारण दोन अक्षरातील साम्य आणि ते नाव जास्त परिचित! आईने ही चूक शिक्षिकेच्या निदर्शनास आणून दिली. शिक्षिकेच्या लक्षात आले की बदल करायचा तर तो अनेक ठिकाणी करावा लागणार! त्याऐवजी शिक्षिका आईला म्हणाल्या "अहो, तुमची मुलगी किती बुद्धिमान आहे(खरंच आहे!), तिला 'मेधा' हेच नाव शोभून दिसेल." आणि ते मेधाच झाले.
धडा-घडा यांचेही केव्हातरी असेच झाले असावे.
मला काही अधिकृत माहिती मिळाली तर ती मनोगतावर पाठवीनच.