श्रीनि आपण आपल्या लेखातच लिहिले होते...

१) संतांच्या उपदेशामुळे मराठी लोक निष्क्रीय झाले, हे मला पटत नाही.
त्याला प्रतिसाद देतांना विनायक ह्यांनी वरील मत कुणाचे आणि कसे प्रचलित झाले हे लिहिले होते. 

आता या माझ्या मुद्द्यात मी संतांना कुठे दोष दिला आहे ? किंवा त्यांनी समाज निष्क्रीय केला असे कुठे म्हणालो आहे ?

हा मजकूर आहे आपल्या ११-१०-०४ रोजी लिहिलेल्या संदेशातील. वरील संदर्भावरुन आपल्या लक्षात हे आलेच असेल की संतांनी समाजाला निष्क्रीय केले ह्या म्हणण्याला आपल्या तिघांचाही विरोधच आहे. किंवा आपण कुणीही संतांना दोष देत नाही आहोत.
"हाकारोनी सांगे तुका नाम घेता राहो नका" म्हणणारे तुकोबा नंतर हेही म्हणतातच ना .....
"वेदांचा अर्थ आम्हासी पुसावा येरांनी व्हावा भार व्यर्थ" किंवा
" नाश केला शब्दज्ञाने,अर्थे लोपली पुराणे"
स्वत: भंडारा डोंगरावर साधना करतात आणि साक्षात्कार झाल्यावर लिहितात...
"नको सोडू अन्न,नको सेवू वन
चिंती नारायण सर्व भोगी"

संतांनी कुठेही आत्मप्रौढी केली नाही. समाजाला वाममार्गाला लावले नाही. संतांचा परमार्थ आणि देव रोकडाच होता आणि आहे.

दोष आहे तो सर्वसामान्य माणसांचा.... त्यांना काहीही कष्ट न घेता प्रपंच आणि परमार्थ सांग आणि चांग व्हायला हवे असते.

अहो, साधी पदवी घेण्यासाठी आपल्याला आयुष्यातील कमीत कमी १५ वर्षे खर्ची घालावी लागतात आणि सामान्य माणसाला देव मात्र सद्गुरुंनी फक्त डोक्यावर हात ठेवून हवा असतो.
"अशाने देव काय मिळायचा नाय,देव काय बाजारचा भाजीपाला नाय " हे सांगायची वेळ आता आली आहे.

मला वाटते "परमेश्वराला रिटायर"करण्यापेक्षा परमेश्वर ही संकल्पना नीट समजावून घेवून पुन्हा समाजात प्रस्थापित करणे ही आज काळाची गरज आहे. त्याच्या प्राप्तीसाठीची साधना स्वत: करुन मग समाजाला त्याप्रमाणे मार्ग दाखवायलाच हवा ना!
आम्ही आमच्या सद्गुरुंचे कार्य "जीवनविद्यामिशन"द्वारे करण्यासाठी बालसंस्कार केन्द्र,अभ्यासवर्ग,उपासनायज्ञ आणि दिव्यसाधना  हे टप्पे नक्की केले आहेत.त्याप्रमाणे सद्गुरु स्वत: किंवा आमचे जेष्ठ साधक प्रवचनातून हे कार्य करत असतात.