मला वाचल्याचे स्मरते की आज आपण म्हणतो त्या गणपती, देवी, शंकर, मारुती यांच्या आरत्या या प्रथम समर्थ रामदासांनी रचल्या आहेत. इतरांच्याही आहेत, पण त्यांचा काळ नंतरचा दिसतो. त्या काळात लोकांना संस्कृत शब्दांचे शुद्ध उच्चार जमत नसत म्हणून रामदासांनी आरत्या सर्वसामान्यांनाही म्हणता याव्यात यासाठी त्या सोप्या, रसाळ आणि चालीत रचल्या. दुसरे आणखी एक कारण असे वाटते, की मराठी ही त्या काळात लोकभाषा म्हणून चांगलीच रूळली होती. रामदासांना त्यांचा पंथ व चळवळ बहुजनांत रूजवून जागृती करावयाची असल्याने त्यांनी मूठभरांना अवगत असलेल्या संस्कृतऐवजी मराठी या लोकभाषेला प्राधान्य दिले.