कुसंस्कारांनी भरलेला पोषाख? पोषाखावर कसले संस्कार होतात?
निराळा पोषाख केल्याने इतरांशी संपर्क कसा कमी होतो? हे काय मला पटत नाही. कित्येक सोवळे नेसलेले भटजी बडबडे पाहिलेले आहेत. त्यांच्या सोवळ्याने त्यात काही फरक पडला नाही.
मंत्रोच्चारातून ध्वनी स्पंदने निघतात हे खरे पण विद्युत लहरी कशा निघतील? रेशीम आणि लोकर हे स्ट्याटिक निर्माण करतात हे खरे पण ध्वनी अंगभर फिरायला हे कपडे कशी मदत करतील? कितीतरी पूजाविधीत डोक्यावर काहीही वस्त्र नसते. मग ही स्पंदने डोक्याभोवती फिरणार कशी? मंत्राची स्पंदने शरीराभोवती फिरतात आणि त्याचा काही फायदा होतो हे कुणी मोजले आहे का? 

 अजून एक शंका. पुजेत चामड्याचा विटाळ होतो असे ऐकून आहे. मात्र व्याघ्राजिन वा मृगाजिन अर्थात् वाघाचे वा हरणाचे कातडे चालते असे का?
  सर्कसचे लोक वा पैलवान विशिष्ट पोषाखच का घालतात ह्याला योग्य व्यवहारी कारणे आहेत. पैलवानांना हालचाल करणे सोपे जावे आणि सर्कस खेळाडू आकर्षक कपडे घालून आपले प्रयोग जास्त झगमगीत करतात. तीच गोष्ट क्लीन रुम मधील वेषाची.
 तितके स्वच्छ, पटेल आणि आजमावता येईल असे कारण सोवळे नेसण्यामागे मला दिसलेले नाही. एक रुढी हेच मुख्य कारण वाटते.