हा चर्चाप्रस्ताव आवडला. कुमारशी सहमत आहे.
एक मुख्य फरक म्हणावा तो असाः
महाराजांना स्वराज्य स्थापन ( निर्माण ) करावे लागले, महाराणा प्रतापांकडे आधीच स्वतःचे राज्य होते ज्यावरील अकबराच्या स्वाऱ्यांमुळे त्यांना सतत लढावे लागले.
माझ्यामते तुलनाः
१. दोघेही पर्वतांचा सहारा घेऊनच मुख्यत्वे शत्रूशी लढले. महाराज सह्याद्री तर प्रताप अरावली!
२. महाराजांना मराठे व सर्व जातीजमातीच्या माणसांनी जिवाभावाची साथ दिली, प्रतापांना प्रामुख्याने भिल्ल जमातीने साथ दिली.
३. दोघांच्याही राज्यात फितूर खूप होते.
४. महाराजांच्या 'स्वराज्य स्थापना' या महान कार्यात त्यांना तीन आघाड्यांवर लढावे लागले, मुघल, विजापुर व आपल्या राज्यातील फितूर! प्रतापांना प्रामुख्याने फक्त अकबराशी म्हणजे मुघलांशी लढावे लागले.
५. महाराजांचे जवळ जवळ सर्व आयुष्य हे स्वराज्य स्थापना याच कार्यात गेले तर प्रताप आधीचे राजे असल्यामुळे राज्य टिकवणे यात त्यांचे आयुष्य गेले.
६. गनिमी कावा - मराठ्यांना गनिमी काव्याशिवाय पर्यायच असू शकत नव्हता. साठ मावळ्यांनी दोन हजार मुघल फौजेविरुद्ध एका रात्रीत पन्हाळा पुन्हा स्वराज्यात आणणे हे फक्त त्या तंत्रामुळेच शक्य होते व त्यास सह्याद्रीची साथ होती. प्रतापांनी वीस हजार सैन्यानिशी अकबराच्या ऐशी हजार फौजेला इतके अचाट त्रस्त करून सोडले की अकबराचे डोळे पांढरे झाले होते. पण हे करण्यासाठी प्रतापांना मेवाड सोडून
कुंभलगड या अरावली रांगेत जावे लागले. म्हणजे, आपली नित्य राजधानीच त्यांना बदलावी लागली. हाही एक प्रकारे गनिमी कावाच होता, कारण मुघलांना पर्वतात काहीच लढता येत नव्हते. याच हलदीघाटी लढाईत प्रतापांचा चेतक त्यांचे प्राण वाचवायच्या प्रयत्नात मेला. सारांश, गनिमी कावा हे तंत्र दोन्ही राजांनी वापरलेच.
७. तसे पाहायला गेले तर राज्यविस्तार हे राजाचे एक कर्तव्य असतेच व मुघलांमध्ये ती अभिलाषा जरा जास्तच दिसते. पण अकबर हा औरंगजेबाहून सौम्य प्रवृत्तीचा राजा म्हणावा लागेल. औरंगजेब अत्यंत क्रूर, घातकी व पाताळयंत्री होता. शौर्य हा भाग जर बाजूला ठेवला तर महाराजांनी त्यांची बुद्धी व दूरदृष्टी कित्येक पटींनी जास्त आहे हे अनेक प्रसंगात दाखवून दिले.
अ. आरमार बांधणे
ब. आग्र्याहून सुटका ( हा प्रकार औरंगजेबाच्या जिव्हारी लागला व त्याची सर्वदूर निंदानालस्ती झाली. )
क. अफजलखान, सिद्दी जौहर, शाहिस्तेखान, सूरतलूट या सर्व घटनांमधे!
ड. एकदा आदिलशहाशी तर एकदा दिल्लीशी प्रामाणिक असण्याचे सिद्ध करून नंतर वेळ आल्यावर दोघांनाही अचंबीत करून टाकणे!
एकंदर तौलनिक दृष्ट्या महाराजांसमोरची आव्हाने संख्येने व दर्जाने जास्त भीषण, त्यांचे कार्य राज्य टिकवण्याचे नसून राज्य-निर्मीतीचे, इंग्रजांच्याही हालचाली नशिबात येणे असे... तर प्रतापांसमोर राज्य टिकवणे, एकामागे एक अशा मुघल स्वाऱ्यांपासून बचाव करणे असे होते!
दोनच गोष्टींमध्ये ते दोघेही तितकेच थोर होते.
१. भूमीची भक्ती
२. शौर्य!
-सविनय
बेफ़िकीर!