-प्रचलित पूजापद्धतीविषयी यथामति माहिती देत आहे.
१. षोडशोपचार.
प्रचलित पूजाविधीमध्ये, पुरुषसूक्ताचे १६ श्लोक प्रत्येक उपचारासाठी १ याप्रमाणे म्हणून, तो तो उपचार केला जातो. (उपचार म्हणजे विधी ह्या अर्थाने)
१. आवाहन, २- आसन, ३-पाद्य, ४-अर्घ्य, ५-आचमन, ६- स्नान, ७- वस्त्र, ८- यज्ञोपवीत, ९-गंध (अक्षता, हरिद्रा-कुंकुमादिसौभाग्यद्रव्ये) १०- फुले वाहणे, ११-धूप, १२-दीप, १३-नैवेद्य, (आरती) १४-प्रदक्षिणा, १५- (साष्टांग)नमस्कार, १६- प्रार्थना/स्तुती (मंत्रपुष्प)
येथे १६ व्या क्रमांकाची जी प्रार्थना/स्तुती (यज्ञेन यज्ञमयजन्त देवाः) आहे, ती आपण हल्ली १३ व्या क्रमांकानंतर, म्हणजे नैवेद्यानंतर आरती झाली की लगेच म्हणतो. (अर्थात, तरीही पूजेचा क्रम म्हणून क्र. १५ नंतरही पुन्हा (यज्ञेन यज्ञमयजंत देवाः) म्हटले जाते, व नंतर 'आवाहनं न जानामि' इ. इ. प्रार्थना)
अर्थात, ह्या साऱ्या उपचारांसाठी पुराणोक्त मंत्रही आहेतच. त्यामुळे, अर्थाच्या दृष्टीने तरी (मला) ते सोयीचे वाटतात. आपण नक्की काय म्हणतोय ते कळते म्हणून.
२. मुळात, पूजाविधी सुरू कधी झाला हा मुद्दा विचारात घेतला, तर तो काळ खूपच मागचा निघेल. मनुष्य प्रतीकपूजा करू लागला तेव्हापासूनच पूजाविधीला सुरुवात झाली असावी. षोडशोपचार हे फक्त त्याचं अधिक 'सिविलाईज्ड' रूप.
३.त्यातही 'आरती' बद्दल बोलायचं म्हटलं, तर आरती हा 'आर्तिक्य' वरून आलेला शब्द. आर्तिक्य हा शब्द जरी अवघड वाटला, तरी त्याचा प्रत्यक्ष वापर हा भावनिकतेशी जास्त निगडीत आहे. 'आरती ओवाळणे' मध्ये ''ओवाळणे'' ह्या शब्दाची जी अजून एक छटा आहे, 'ओवाळून टाकणे' ती जास्त विचारात घेतली जात असावी असे वाटते. त्यामुळे, आरती म्हणून आधी देवाची स्तुती/ अपराधक्षमा इत्यादी संस्कृतभाषेतील पद्यप्रकार म्हटले जात असले, तरी कालांतराने संस्कृत उच्चार आणि मुख्य म्हणजे त्या पद्यांचे अर्थ कळणे अधिक अवघड होत गेले असावे, व त्यामुळेच, आरत्या किंवा इतरही अनेक कवने ही मराठीतीलच जास्त प्रेफर केली जात असावीत. (अर्थात, आत्ताच्या काळात, आरती/कवन म्हणताना त्याचा अर्थ आणि भाव ह्याचा विचार किती केला जातो हा एक मोठा प्रश्नच आहे)संस्कृत कळले तर ते भावपूर्ण पद्धतीने म्हटले जाणार. अनेक संतांनी आरत्या, किंवा देवाच्या स्तुतिपर अनेक भावपूर्ण रचना करून, आपल्या सगळ्यांवर खूप उपकार केलेत (परतफेड अशक्यच, पण प्रयत्न कितपत होतोय हा ज्याने त्याने विचार करायचा मुद्दा)
४.बाकीचे पूजाविधी संस्कृतातूनच राहिल्याचे एक कारण म्हणजे, परंपरागत पद्धत, ब्राह्मण (पुरोहित) वर्गाशिवाय इतर कुणीही (महिला सुद्धा) पूजाविधी करीत नसत (सध्या परिस्थिती बदलली असली, तरीही परंपरेचा मुद्दा आहेच), आणि पुरोहित वर्गापैकी कुणीही ह्या पूजाविधीला अमृतातेहि पैजा जिंकणाऱ्या भाषेत आणायचा प्रयत्न केला नाही. (निदान मला तरी तसे माहीत नाही. चू. भू. दे.घे)
- चैतन्य.