प्रोफेसर मुहमद युनुस यांना २००६ चे नोबेल प्राईज मिळाल्यावर राष्ट्रीय कृषी ग्रामीण बँक (नाबार्ड) च्या मुख्यालयाला भेट दिली होती. त्यावेळेस त्यांनी बांगलादेशात ग्रामीण बँकेचा जो प्रयोग केला त्याबद्दल सविस्तर भाषण केले होते. हा सर्व प्रयोग ग्रामीण भागातील द्रारिद्र्यरेषेखालील लोकांच्या उन्नतीसाठी केला होता व त्याला यशही प्राप्त झाले होते.

महाराष्ट्रातील ग्रामीण जनतेला या प्रयोगाबद्दल माहिती व्हावी या हेतूने मी या भाषणाचा मराठीत स्वैर अनुवाद केला होता व तो अनेक स्वयंसेवी संस्थांना विनामूल्य पाठविला होता. ही सर्व गोष्ट २००७ मधली आहे.

मागील आठवड्यात एका मित्राने "हा अनुवाद तू मनोगतमध्ये का लिहीत नाहीस? तसे केले तर तो जास्त लोकांपर्यंत पोहोचेल" असे सुचविले म्हणून हा प्रयत्न केला आहे.

मला वाटते प्रोफेसरांनी हा सर्व प्रयोग ग्रामीण भागासाठी केलेला असल्यामुळे ग्रामीण भागातील लोकांना याबाबत जास्त माहिती असणे गरजेचे आहे. "बँकर टू द पूअर" हे पुस्तक ग्रामीण भागातील लोक विकत घेऊन वाचतील अशी अपेक्षा ठेवायला माझी काहीच हरकत नाही. पण त्याचबरोबर जर या पुस्तकाचा सारांश मोफत उपलब्ध करून दिला तर त्याने काही तोटाही होणार नाही असे वाटते. या सारांशामुळे मूळ पुस्तक वाचायची कोणाला तरी इच्छा झाली तरी खूप झाले. या पुस्तकाचा सारांश काढावयाचा झाला तर त्यासाठी स्वतः मुहमद युनुस यांच्यापेक्षा कोणबरे योग्य असेल? म्हणून त्यांच्या भाषणाचाच आधार घेतला आहे.