गफलत झाली हे मान्य करूनसुद्धा काही प्रश्नांबाबत शंका आहे.

१) काँग्रेसला  आपल्या उमेदवाराचे " राष्ट्रीयत्व " तपासून पाहावेसे का वाटले नाही.

प्रत्येक राजकीय पक्ष हा देशभर अनेक मतदारसंघांतून निवडणूक लढवत असेल, म्हणजेच काँग्रेससारख्या (किंवा इतर कोणत्याही) राष्ट्रीय पक्षाचे साधारणतः पाचशे ते सहाशे उमेदवार रिंगणात असावेत. आगाऊ संशय येण्याचे तसेच काही कारण असल्याशिवाय प्रत्येक ठिकाणी (कोणत्याही पक्षाच्या) प्रत्येक उमेदवाराचे राष्ट्रीयत्व काटेकोरपणे आगाऊ तपासले न जाता, बहुधा उमेदवाराने उमेदवारीच्या अर्जात शपथवार दिलेल्या राष्ट्रीयत्वाच्या माहितीवर काम भागवले जात असावे अशी शंका आहे. (चूभूद्याघ्या. )

(तसेही प्रत्येक उमेदवाराचे राष्ट्रीयत्व काटेकोरपणे आगाऊ तपासणे कितपत शक्य असावे याबद्दलही साशंक आहे.)

२) निवडणुक आयोगाला सुद्धा ही बाब खटकली नाही.

याचेही उत्तर प्रश्न क्र. १च्या उत्तराच्याच धर्तीवर. आगाऊ संशय असण्याचे तसेच काही कारण असल्याशिवाय राष्ट्रीय पातळीवर किती जणांचे राष्ट्रीयत्व तपासणार आणि कशाकरिता हा प्रश्न आहे.

३) जोपर्यंत कोणी न्यायालयात जात नाही तोपर्यंत हे प्रकार असेच चालत राहणार का ?

दुर्दैवाने बहुधा होय.

४) याच प्रकारे एखादा 'पाकिस्तानी घुसखोर " किंवा " बांगलादेशी " घुसखोर अशा प्रकारे खासदार झाला तर आपल्या संसदेचे काय ?

ज्या अर्थी मतदार निवडून येतो त्या अर्थी तो स्थानिक मतदारांना निदान काही काळ तरी परिचित असावा. म्हणजेच, काल बांग्लादेशातून घुसला आणि आज खासदार बनला असे तर निश्चित होत नसावे. काही काळ तरी असा उमेदवार त्या मतदारसंघात एक तर स्थायिक तरी असावा अथवा तेथील मतदारांस परिचित तरी असावा. अर्थात, असा उमेदवार पाकिस्तानी किंवा बांग्लादेशी असणे आणि मतदारांना त्याबद्दल माहीत नसणे हे अशक्य नाही, परंतु असे तितकेही सर्रास होत नसावे, किंबहुना फार क्वचित होत असावे, आणि कधी तसे झाल्यास न्यायालयातर्फे अशा उमेदवाराची निवडणूक रद्द होण्याची तरतूद आहेच.

५) याबाबतीत बाकीचे "राजकीय पक्ष " काय भूमिका घेतील.

अर्थात अपेक्षित तीच. (पण हे कोणत्याही पक्षाच्या बाबतीत होणे अशक्य नाही आणि झाल्यास इतर पक्ष त्याबद्दल नेमकी तशीच भूमिका घेतील, हेही ओघाने आलेच. )

६) आणि शेवटची पण महत्त्वाची बाब अशी की सर्वसामान्य भारतीय नागरिकाचे काय ?

सर्वसामान्य भारतीय नागरिकाचे नेमके काय? प्रश्न कळला नाही.

हे तितकेही सर्रास होत नसावे. एखादवेळेस झाल्यास (आणि लक्षात आल्यास) न्यायालयाकडे धाव घेऊन अशा उमेदवाराची निवडणूक रद्द करवून घ्यावी.

(परंतु इतर पक्ष हे कार्य बहुधा करतीलच. त्यामुळे काळजी नसावी. )

उद्या मुंबैतून एखादा "बांगलादेशी " माणूस खासदार म्हणून निवडून आला तर ?

असे होणे कठीण आहे, परंतु अशक्य नाही. (वर म्हटल्याप्रमाणे, ज्याअर्थी उमेदवार मुंबईतून निवडून येतो, म्हणजेच ज्याअर्थी मुंबईचे मतदार अशा उमेदवारास मते देतात, त्याअर्थी मुंबईतील मतदारांना बहुधा उमेदवाराबद्दल पूर्वकल्पना असावी.) तरीही असे यदाकदाचित घडल्यास बहुधा कधी ना कधी कोणाच्या ना कोणाच्या तरी लक्षात यावेच, आणि त्या परिस्थितीत न्यायालयाचा मार्ग मोकळा आहेच.