इतरांना विश्वास देणे व इतरांचा विश्वास मिळवणे ही एक दुर्मिळ कला आहे. पण त्यासाठी त्या माणसाचा स्वत:वरचा विश्वास पक्का असावा लागतो. ज्याच्या स्वत:वरच विश्वास नाही तो इतरांना विश्वास कसा बरे देऊ शकेल?
जेव्हा अंगीकृत कार्य विस्तारू लागते तेव्हा ही कलाच तारते. या कलेमुळे नवीन सहकारी सतत लाभत राहतात. इतकेच नव्हे तर व्यक्तीच्या मृत्यूनंतरही कार्य पुढे चालू राहण्याची शक्यता जास्त राहते.
या कलेतूनच आणखी एक गुण प्रगटतो तो म्हणजे माणसाची पारख. महाराजांनी एखाद्याला काही कामगिरी सांगायची व ज्याला ती कामगिरी सांगितली ती त्याने फत्ते करायची अशा घटनांची मालिकाच त्यांच्या जीवनात दिसून येते.
अंगीकृत कार्यावरची नितांत निष्ठा. ही निष्ठा नाती जाणत नाही. भीती जाणत नाही. मार्ग मिळेपर्यंत खटपट करायला बळ देते. आणि शेवटी मार्गही मिळवून देते. यामुळेच अनेक अशक्य वाटाव्या अशा गोष्टी त्यांच्या जीवनात घडलेल्या दिसून येतात. त्यासाठी स्वतःपेक्षाही अंगीकृत कार्यावर आपले प्रेम असले पाहिजे.
शेवटी सर्वात महत्त्वाचे म्हणजे, जर ते अंगीकृत कार्य अतिउच्च दर्जाचे असेल तर वरील सर्वच गोष्टी अतिउच्च दर्जाच्या होतात हे वेगळे सांगायला नको.