अहो, मी चूक दाखविण्याच्या उद्देशाने हा संदर्भ दिला नव्हता.  इतिहासाचा अभ्यास कधीच पूरा होत नाही नि या विषयाची वीणही कधीच संपत नाही. त्यामुळे सतत नवनवे संदर्भ पाहत बसावे लागतात नि जुन्या संदर्भांशी ते योग्य त्या पद्धतीने जुळवून घ्यावे लागतात. याच दृष्टीने मी काही नवी माहिती तुमच्याकडे असल्यास देण्यासंदर्भात सूचविले होते. एक उदाहरण सांगावे वाटते. शिवाजी महाराजांच्या चरित्रात प्रतापराव गुजरांच्या वीर मरणाचा प्रसंग येतो. (कुसुमाग्रजांची 'वेडात मराठे वीर दौडले सात' ही कविता यावरच आहे) या प्रसंगातील बहलोलखान या आदीलशाही सरदाराचे वंशज म्हणजे हैदराबादचा निजाम होय असा एक संदर्भ वाचनात आला होता. प्रतापरावांना लढाईत मारण्याची बहादुरी दाखविल्याबद्दल आदीलशाहाने बहलोलखानाला भागानगर जवळील एक गाव बक्षीस दिले होते, त्या वरून हा संदर्भ खरा वाटतो. तो जर खरा असेल तर शिवरायांनी प्रतापरावांना "खानास सला काय निमित्य केला" (तह का केला) असा प्रश्न विचारण्यात दूरदृष्टी दाखविली असे म्हणावे वाटते. कारण या निजामाला (बहलोलखानाच्या  वंशजांना) हैदराबाद स्वतंत्र ठेवायचे होते व ते परवडणारे नसल्याने वल्लभभाई पटेलांना सैनिकी कारवाई करावी लागली. म्हणजे तीनशे वर्षांपूर्वी घडलेल्या घटनेचे धागेदोरे तीनशे वर्षांनंतरही सापडतात. एकूण काय तर इतिहास ही घटनांची कधीही न संपणारी मालिका असते. सर्वच घटना एकाच वेळी माहिती होत नाहीत नि सर्वांचा एकाच वेळी अभ्यास करणे जमतही नाही. तेव्हा "चुकीबद्दल क्षमस्व" वगैरे म्हणण्याचे काहीच कारण नाही‌. शिवाय एका प्रतिसादात तुम्ही स्वतःच्या निवृत्तीचा उल्लेख केला आहे. यावरून तुम्ही माझ्यापेक्षा नक्कीच वयाने मोठे आहात. तेव्हा मी चूक दाखविली असे वाटले असल्यास कृपया तसे मानू नये.