'राजा शिवछत्रपती' (ब. मो. पुरंदरे) मध्ये खूप माहिती आहे अफझलखानाबद्दल. ते पुस्तक आता माझ्याकडे नाहीये पण आठवतंय ते असं -
(१) शहाजी राजांना तो पाण्यात पाहायचा. कनकगिरीच्या लढाईत संभाजीला (शिवाजी महाराजांचा मोठा भाऊ) पुढे आघाडीला पाठवून आयत्या वेळी कुमक न पाठवून अफझलखानानं दगा दिला. त्या लढाईत संभाजी ठार झाला.
(२) अफझलखान कपटी असला तरी अतिशय कुशल योद्धा होता. तसंच प्रजेची जाणीव बाळगणारा सेनानी होता. नक्की आठवत नाही पण पुरंदऱ्यांनी त्यानं केलेल्या मला वाटतं शेतकऱ्यांना त्रास न देण्याच्या पत्रांची माहिती दिली आहे.
(३) शिवाजी महाराजांशी युद्ध करण्यासाठी त्यानं त्यांना किल्ल्यातून बाहेर काढायचे अनेक प्रयत्न केले. वाटेत तुळजापूरसारखी सेवस्थानं उद्ध्वस्त केली. त्यानं ओळखलं होतं की गडाला वेढा घालून युद्ध करणं अशक्य आहे. पण महाराजांनी आपल्या चतुराईनं त्याला असं दर्शवलं की ते खूप घाबरले आहेत आणि ते त्याची भेट घेऊ इच्छितात. खानाचा यावर विश्वास बसला आणि त्यामुळे त्याचा वध सुकर झाला.

आपण खानानं आधी वार केला हे साधारणतः समजत असलो, तरी काही जणांचं असं म्हणणं आहे की महाराजांनीच कपटानं त्याला मारलं. लो. टिळकांच्या काळीही हा वाद पुढे आला होता. त्यावेळी टिळकांनी जे म्हटलं ते पूर्ण पटतं - खान कपटीच होता (कनकगिरीचं उदाहरण पाहा), आणि म्हणून, जरी शिवाजी महाराजांनी प्रथम वार केला असता तरी ते योग्यच ठरलं असतं. 

- कुमार