अबीर, तुमचे "पण काही लोक खूपच गद्यस्वरूप काहीतरी लिहितात आणि त्याला कविता म्हणतात.
कविता वाचताना थोडातरी छंद जाणवायला पाहिजे असे वाटते" हे शब्द वाचले आणि तुमचेच अभिनंदन करावे वाटले. वास्तविक पाहता माझी आणि गद्यातील चर्चेत सहभागी होणाऱ्या अनेकांची कविता हीच पहिली आवड आहे/ असेल. पण अनेक कविता केवळ जुळवून लिहिलेल्या असतात नि त्यावर प्रतिसाद देणे नको वाटते. माझी स्वतःची केवळ एकच कविता आतापर्यंत मनोगतवर मी प्रसिद्ध केली आहे व त्यातही जुळवाजुळवीचा प्रकार कदाचित कोणाला जाणवेल. परंतु जो आनंद छंदोबद्ध कविता वाचताना जाणवतो तो मुक्तछंदातील कविता वाचताना जाणवत नाही. खुद्द अनिलांनाही आताच्या मुक्तछंदातील कविता बघवल्या नसत्या. त्यांनीही मुक्तछंदाविषयी लिहिताना कवितेचे कवितापण (गेयता / लयबद्धता ) हेच महत्त्वाचे मानले आहे. त्यांच्या "प्रेम आणि जीवन" या पहिल्या (मुक्तछंदातील) कवितेपासून सर्वच कवितांमध्ये ते जाणवते.
अलिकडेच आलेला एक अनुभव सांगावा वाटतो. मला रोज बसने प्रवास करावा लागतो. या प्रवासात एक कवी रोजच असतो. त्याचे वय साधारणपणे ३५च्या जवळपास असावे. त्याने सुमारे २६००० कविता लिहिल्या असल्याचे सांगितले. म्हणजे सरासरी तो प्रतिवर्षी ७४३ किंवा दिवसाला सुमारे २ कविता लिहितो.त्याचेही त्याने वेळापत्रक केले आहे. त्याच्या कविता एकेदिवशी एक सहप्रवासी वाचत होता. त्याने मला त्या कविता वाचण्यास सूचवले. मी त्या कवीकडे "तुम्ही कोणाकोणाच्या कविता वाचल्या" अशी चौकशी केली. त्याने चक्क " वाचनाबिचनात इंट्रेस नाही" असे मला उत्तर दिले. मला ऐकतानाच विचित्र वाटले. अशा परिस्थितीत छंदोबद्ध कवितेची आवड जपणारे तुम्ही जवळचे वाटलात. अशी छंदोबद्ध कवितेची आवड असणारे तुम्ही एकटे नक्कीच नाही. पण अशी संख्या वाढली पाहिजे तरच कवितेला काही वाचनीयता लाभेल. अन्यथा कवी हा चेष्टेचा विषय झालेलाच आहे. मुळात कवी हा बुद्धिमान मानला गेला आहे, अनेक विषयांचा माहितगार या अर्थाने 'कवि' हा शब्द वापरला जातो. तो प्रकार आता क्वचितच जाणवतो.