इतरांची कवीता वाचणे याचा कवी असण्यापेक्षा रसिक असण्याशी संबंध आहे. इतरांकडून रसिकतेची अपेक्षा धरणार्या (धरत नसाल तर काव्य प्रसिद्ध करण्याच्या किंवा कुणाला ऐकवण्याच्य फंदात पडू नका) कविकडून तो स्वतःही रसिक असावा ही अपेक्षा धरणे अगदीच चूक नाही.
मुळात कवी असणे हीच एक वृत्ती आहे. आणि आपल्या मनातील कल्पना इतरांना समजतील अश्या प्रकारे, गेय स्वरुपात मांडण्याची क्षमता/वृत्ती असणार्यांना कवी म्हणण्याची या मर्त्य जगात पद्धत आहे. गद्य लिहून त्यालाच कवीता म्हणणे हे एक टोक, आणि कसेही करून प्राचीला गच्ची जुळवणे हे दुसरे. चांगला कवी या दोहोंच्या मध्ये कुठेतरी असावा. एखाद्या चांगल्या कवीला वृत्त वगैरेचा फारसा विचार न करताही स्फुरणारी कवीता एखाद्या वृत्तात बसणारी असू शकेल.
एक प्रश्नः चांगला गायक होण्यासाठी संगीत हे कानातून रोमारोमात झिरपावे/भिनावे लागते. उपजत प्रतिभेबरोबरच योग्य शिक्षण आणि सराव फार आवश्यक असतो. त्याच प्रमाणे, चांगला कवी होण्यासाठी उपजत प्रतिभेबरोबर, शिक्षण म्हणून इतर कवींच्या कवीता वाचण्याने फायदा होत असेल का?
- मन्दार.