आयटी उद्योगामुळे अलिकडच्या काळात काही नव्या आणि विचित्र समस्या निर्माण झाल्या आहेत, हे खरेच. एक तर मध्यमवर्गात 'उच्च मध्यमवर्ग' ही एक नवी श्रेणी उदयाला आली. ३० ते ५० हजार रूपये पगारवाला उच्च मध्यमवर्ग, १५ ते २५ हजार रूपये पगारवाला मध्यम मध्यमवर्ग आणि १५ हजारांखाली पगार असणारा कनिष्ठ मध्यमवर्ग अशी सरळ विभागणी झाली आहे. समाजात या वर्गांना मिळणारी वागणूकही वेगवेगळी आहे. नारायण मूर्तींच्या पत्नी सुधा मूर्ती यांनीच एक किस्सा सांगितला होता. त्या एकदा दुकानात फळे आणायला गेल्या. 'नेहमी फळे नेणाऱ्या बाई' याखेरीज दुकानदार त्यांना ओळखत नव्हता. सुधाताईंना काही फळांचे भाव खूपच महाग वाटले. त्या घासाघीस करू लागल्या. त्यावर कंटाळवाण्या सुरात दुकानदार म्हणाला, 'बाई! ती फळे तुमच्यासारख्यांना परवडणार नाहीत. त्याचे गिऱ्हाईक वेगळे आहे. ' तेवढ्यात एक भपकेबाज पोशाखातील तरूण आला. दुकानदाराने अदबीने त्याला पाहिजे ती फळे तत्परतेने दिली. त्या तरूणाने नोटांची चळत काढली. किंमत अदा केली आणि फळांची करंडी घेऊन निघूनही गेला. त्यावर सुधा मूर्ती यांनी दुकानदाराला विचारले, ' हे श्रीमंत ग्राहक कोण? ' त्यावर दुकानदार म्हणाला, ' ते साहेब इंफोसिस कंपनीत नोकरीला आहेत. '

आता काही परिणाम पाहू.

१) पुण्यासारख्या शहरात सदनिकेच्या किंमती ३० ते ५० लाख रुपये आहेत. त्यासाठी वित्तसंस्था कर्ज देताना आयटी कंपन्यांतील नोकरदारांना प्राधान्य देतात. पुण्यात मध्यवर्ती भागात २ बीएचके सदनिका मध्यम मध्यमवर्गीयांनाही परवडत नाहीत.

२) पूर्वी मध्यमवर्गीय उपवर मुली बँकेतल्या नोकरदाराला स्थळ म्हणून प्राधान्य देत. अलिकडे त्यांची पसंती आयटी नोकरदाराला असते.

३) जे पती पत्नी दोघेही आयटीत कामाला आहेत ते एकमेकांना पुरेसा वेळ देऊ शकत नाहीत. मूल होणे लांबवणे किंवा मूल नकोच, अशी मनोवृत्ती वाढत आहे. थोडक्यात डिंक (डबल इंकम नो कीडस) जोडपी होत आहेत. सुख एकदम मिळाल्याने किंवा मनोबंध न जुळल्याने किंवा आजकालच्या असंयमी वृत्तीमुळे घटस्फोटांचे प्रमाण वाढत आहे. त्यातही आयटी जोडपी आघाडीवर आहेत.

४) बारा बारा तास कामाच्या मानसिक ताणामुळे तरूण वयातच ही पिढी खुरटून जात आहे. हा फटिग त्यांना वयाच्या पस्तिशीनंतर निरूपयोगी बनवणारा आहे.

५) वडिलांना आयुष्यभर राबून निवृत्त होताना जो अखेरचा पगार असेल तो मुलगा आयटीत लागल्यावर त्याचा सुरवातीचा पगार असतो. यातूनही दोन पिढ्यांतले मानसिक अंतर वाढत आहे. नव्या पिढीत हवा तो आनंद पैसे फेकून तत्काळ मिळवण्याची मानसिकता वाढत आहे. संयमातून मिळणाऱ्या साफल्याचे समाधान दिसतच नाही.

अर्थात आपण जे चाललेय ते पाहाण्याखेरीज काय करणार? परिस्थिती विचित्र आहे एवढं जाणवतंय.