प्रथम तुम्ही ह्या रचनेला दिलेल्या वेळाकरता मनःपूर्वक आभार.
आपले प्रतिसाद पाहून त्रयस्थाच्या नजरेतून कवितेचं पुनर्वाचन करुन पाहिलं, आणि लक्षात आलं की माझ्या सदोष
मांडणीमुळे रचनेत संदिग्धता आली आहे. तुमच्यासारख्या वाचकांना परिणामी झालेल्या मनस्तापाबद्दल, आणि विलंबित
प्रतिसादाबद्दल कृपया क्षमा करावी !
कवितेचा निवेदक आणि पत्नी ह्यांच्या विवाहाच्या एकविसाव्या वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर थोडंफार सामाजिक
आणि राजकीय भाष्य करायचा हा प्रयत्न होता. त्यांचं लग्न / वैवाहिक नातं मतदानपात्र वयाचं झाल्यामुळे आपल्याला
आजवर मिळालेल्या वागणुकीबद्दल पती व पत्नी ह्या दोन उमेदवारांबाबत मतप्रदर्शन करायचा हक्क मागतंय ,
अशी कल्पना आहे.
मतदान गुप्त असून, कोणा एकालाच मत मिळणार असल्याने दुसर्या 'पक्षा' विरुद्ध अविश्वासाचा ठराव मंजूर होणार.
ही नामुष्की येऊन 'समारंभपूर्वक शोभा' होण्याची शक्यता पति-पत्नी दोघांना अस्वस्थ करत आहे. एकमेकांविरुद्ध
उभे ठाकलेले हे दोघे उमेदवार आपसात संगनमत करतात; आणिबाणीच्या 'प्रथे'चा आश्रय घेउन 'लग्नाचं नातं'
नामक भाबड्या मतदाराचाच पराभव करून स्वतःची पाठ थोपटून घेतात, असं दाखवण्याचा प्रयत्न होता.
कळावे, लोभ असावा ही विनंती !