होम्सच्या गोष्टींची भाषा हे त्यांचे एक वैशिष्ठ्य आहेच. पण गोष्टींमधली वर्णने सुद्धा ह्या गोष्टींना वाचनीय बनवतात.
आता ह्याच गोष्टीत पहा न! विल्सन साहेब आपली हकीकत सांगत असतात तेव्हा म्हणतात :
"आठ आठवडे असे गेले. आतापर्यंत मी Abbots, Archery, Armour, Arcitecture, Attica हे संपवलं होतं. ह्याच गतीनं मी काम करत राहिलो तर लवकरच मी B ला पोहोचेन अशी मला खात्री होती."
खरं तर वरील वाक्यांचा कथानकाशी तसा संबंध नाही. (मीही माझ्या सारांशात ते गाळलेच आहे!) पण त्यामुळे काय होते? खाली मान घालून, इमाने इतबारे एन्सायक्लोपीडिया उतरवून काढणारे विल्सन साहेब आपल्या डोळ्यांसमोर उभे रहातात की नाही? होम्सच्या बऱ्याच कथांमध्ये अशी वर्णने असतात. साधारणपणे आपण वर्णनांना 'रसभरित' असे विशेषण लावतो. पण ही वर्णने रसभरित नव्हे तर जिवंत असतात. त्यामुळेच होम्सच्या गोष्टी काल्पनिक वाटत नाहीत. प्रत्यक्ष घडलेल्या घटनांबद्दलच आपण वाचत आहोत असे वाटते.
------------
ह्या गोष्टी १०० वर्षाहूनही जास्त जुन्या आहेत. त्यामुळे तेव्हाच्या परिस्थितीचे प्रतिबिंब त्यात अर्थातच दिसते.
उदा. विल्सनला त्याचे काम सांगताना त्याचा बॉस म्हणतो :
"एन्सायक्लोपीडियाचा पहिला खंड तिथे आहे. तुम्हाला आम्ही टेबल आणि खुर्ची देऊ. शाई, टाक आणि टिपकागद तुमचा तुम्ही आणायचा."
जी मुले आता १०/१२ वर्षाची आहेत त्यांना टीपकागद म्हणजे काय हे माहितीही नसेल! तसेच विजेचे दिवे, टेलिफोन इ. नसणे हे पण नव्या पिढीच्या कल्पनेच्या पलीकडचे आहे.